रत्नागिरी : भाजपाच्या क्लस्टर बैठकांना प्रारंभ

रत्नागिरी : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. महायुतीमधील मोठा पक्ष असलेल्या भाजपने रत्नागिरी विधानसभा मतदार संघात आजपासून क्लस्टर बैठकांना सुरवात केली. अजून जागावाटप झालेले नसले तरी भाजपला विजयी करण्यासाठी आपला बूथ मजबूत करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला. भाजपचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा आपले सरकार येण्यासाठी प्रोत्साहित केले.

माझा बूथ सर्वांत मजबूत या संकल्पनेवर निवडणूक जिंकण्यासाठी आजपासून क्लस्टर बैठका सुरू झाल्या आहेत. विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. तालुक्यातील गावडे आंबेरे येथील क्लस्टरमधील १३ बूथमधील सुमारे १०० कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. यामध्ये भाजपाला विजयी करण्याचा संकल्प करण्यात आला. मेरा बूथ सबसे मजबूत, बूथ जितेगा चुनाव जितेगा, बूथ सशक्तीकरण अभियान राबवण्यात आले.

नवीन मतदार किती आहेत, मतदार याद्यांचे वाचन, बूथवर कार्यकर्त्यांनी कसे नियोजन करायचे आहे याबाबत बाळ माने यांनी बूथप्रमुखांना मार्गदर्शन केले. केंद्र व राज्यात आपले सरकार असल्याने डबल इंजिनद्वारे विकास सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपले सरकार निवडून येण्याकरिता महायुतीला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, असे आवाहनही या वेळी केले. या कार्यक्रमाला भाजप मंडल अध्यक्ष दादा दळी, तालुका सरचिटणीस सुशांत पाटकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष भाई जठार तसेच माधवी माने आदींसह भाजप पदाधिकारी, बूथ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

तिकीटाची उत्सुकता
रत्नागिरी विधानसभा मतदार संघात अजून महायुतीकडून कोणालाही तिकीट जाहीर झालेले नाही. हे तिकीट देण्याचा निर्णय वरिष्ठ घेतील; परंतु आपण भाजपला जिंकवण्यासाठी आपला बूथ मजबूत करण्याचे ठरवण्यात आले. आजपासून तीन दिवसांत क्लस्टर बैठका होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 19-10-2024