चिपळूण : कळंबस्तेत बिबट्याकडून कुत्र्याची शिकार

चिपळूण : येथील कळंबस्ते गावात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. शुक्रवारी पहाटे एका कुत्र्याची बिबट्याने शिकार केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दीड महिन्यात ही चौथी शिकार आहे.

कळंबस्ते गावात मागील काही दिवसांपासून बिबट्याची दहशत सुरू आहे. गावातील मोकाट कुत्र्यांची बिबट्या शिकार करत आहे. त्यामुळे कळंबस्ते गावात कुत्र्यांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. कळंबस्ते बाजारपेठेतही कुत्र्यांचा वावर असतो; मात्र काही दिवसांपासून बिबटया बाजारपेठेत येऊ लागला आहे. तो कुत्र्यांची शिकार करत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील मोकाट कुत्री गायब झाली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या पाळीव कुत्र्यांवर बिबट्या हल्ले करत आहे. कळंबस्ते गावच्या बाजारपेठेत अमोल कालप यांनी बिगल जातीचा कुत्रा घराच्या दरवाजासमोर बाहेरील पोर्चमध्ये बांधून ठेवला होता. कुत्रा झोपला असताना बिबट्याने कठडयावर चढून पोर्चमध्ये शिरकाव केला आणि कुत्र्याची शिकार केली. ही घटना इमारतीच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाली आहे. कुत्र्याची शिकार करण्यापूर्वी बिबट्याने आंब्याच्या फांदीवरून पोर्चमध्ये उडी मारली होती तेव्हा मोकाट कुत्री भुंकत होती. सकाळी कालप यांना पोर्चमध्ये कुत्रा दिसला नाही. त्यांनी सीसीटीव्ही तपासले असता बिबट्याने कुत्रा पळवण्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कळंबस्ते गावातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 19/Oct/2024