चिपळूण पालिकेची ४८ संकुले, इमारतींना नोटीस

चिपळूण : शहरात काही ठिकाणी पालिकेने जमिनीखाली पार्किंगची परवानगी दिली आहे. पावसाळ्यात त्या ठिकाणी पाणी साठून तलाव तयार झाले आहेत. तेथील रहिवाशांनी आणि वाहनचालकांनी आपल्या वाहनांचे पार्किंग कुठे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील वाढत्या वाहतूककोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिका प्रशासनाने ४८ व्यापारीसंकुले इमारतींना पार्किंगसंदर्भात गंभीर उल्लंघन केल्याबद्दल नोटिसा बजावल्या आहेत. येत्या सात दिवसांत आवश्यक सुधारणा न झाल्यास थेट दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा पालिकेने दिला आहे. शहरातील अनेक व्यापारीसंकुले व खासगी इमारतींनी बांधकाम परवान्याच्या अटीनुसार, पार्किंगची सोय न करता ती जागा व्यापारी उपयोगासाठी वळवली आहे. परिणामी, रस्त्यावर वाहनांचा ताण वाढत असून, वाहतूककोंडी अधिकच गंभीर होत आहे. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत शहरातील प्रमुख रस्त्यांवर गोंधळ निर्माण होत आहे. आगामी गणेशोत्सव काळात शहरात भाविकांची मोठी गर्दी येणार असल्याने वाहतुकीचा प्रश्न अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पालिका प्रशासनाने वेळीच कठोर भूमिका घेत पार्किंग व्यवस्थेतील त्रुटींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेने पाठवलेल्या नोटिसांमध्ये संबंधित व्यापारीसंकुले व इमारतींच्या मालकांना सात दिवसांत योग्य पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहे. या कालावधीत सुधारणा न झाल्यास जागा सील करणे, दंड आकारणे अशा कठोर कारवाया केल्या जातील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पालिकेचे अधिकारी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करतील. नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांना कोणतीही सवलत न देता कठोर कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

व्यावसायिक इमारतीही पार्किंगशिवाय
शहरातील अनेक इमारतींना पार्किंगची व्यवस्था नाही. व्यावसायिक इमारतीसुद्धा पार्किंगशिवाय उभ्या आहेत. चिंचनाका येथील सातमजली इमारतीला जमिनीखाली पार्किंगची व्यवस्था देण्यात आली आहे. त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे.

ज्यांना पालिकेने नोटीस पाठवली आहे त्यांनी पार्किंगच्या जागा मोकळ्या कराव्यात म्हणजे गणेशोत्सव काळातील वाहतूककोंडीचा प्रश्न कमी होईल- मंगेश पेढामकर, प्रशासकीय अधिकारी चिपळूण पालिका

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 22/Aug/2025