लांजा : गणेशोत्सव तोंडावर आला असताना मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली असून, लांजा बाजारपेठेत रस्त्यावरून वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. हा रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे. यंदा गणरायांसह चाकरमान्यांचा प्रवास या खड्ड्यातूनच होणार आहे.
गणपतीच्या सणाला आठ दिवस उरले आहेत. गणेशोत्सवासाठी चाकरमानी मंडळी मोठ्या संख्येत गावी येतात. घरोघरी गणरायांचे आगमन होणार असल्यामुळेच भक्तगणांत उत्साहाचे वातावरण असते. सततच्या कोसळणाऱ्या तुफानी पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. लांजा बाजारपेठेत रस्त्याची कामे अर्धवट स्थितीत आहेत. साहित्यही इतरत्र पडलेले असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. लांजा कोर्ले ते साटवली तिठा या रस्त्याची चाळण झाली आहे. खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेल्या रस्त्यावरून वाहने चालवणे धोकादायक बनले आहे. पादचारी यांना चालतानाही कसरत करावी लागत आहे. लांजा शहरातील कोर्लेतिठा ते साटवलीतिठापर्यंत रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 22/Aug/2025














