Breaking : रत्नागिरी गोहत्या आंदोलन : आमदार निलेश राणे यांच्यासह 28 जणांची निर्दोष मुक्तता

​रत्नागिरी : गेल्या वर्षी रत्नागिरीत वासराच्या हत्येविरोधात झालेल्या आंदोलनाप्रकरणी आमदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने यांच्यासह एकूण 28 आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. राज्य सरकारने हे खटले मागे घेतल्याने हा निकाल देण्यात आला.

​गेल्या वर्षी एमआयडीसी परिसरात एका वासराची मान कापलेली आढळल्याने रत्नागिरी जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. या घटनेतील आरोपींवर कारवाई होत नसल्याने सकल हिंदू समाजातर्फे पोलिस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते.

​पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी मुख्य रस्त्यावर रास्ता रोको केला होता. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. अखेर पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. या रास्ता रोकोमुळे जवळपास चार तास मुख्य मार्ग बंद होता.

​या प्रकरणी पोलिसांनी 28 जणांविरोधात गुन्हे दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. मात्र, राज्य सरकारच्या नव्या धोरणानुसार, ज्या आंदोलनांमध्ये मारहाण किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही, असे गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात. या धोरणानुसारच राज्य सरकारने हा खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे न्यायालयाने या खटल्यातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

​या खटल्यामध्ये आरोपींच्या वतीने ॲड. निनाद शिंदे, ॲड. चाचले, ॲड. थरवळ आणि ॲड. भाऊ शेट्ये यांनी बाजू मांडली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 22-08-2025