रत्नागिरी : चिपळूणमधील पूर नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाजपमध्ये अलीकडेच दाखल झालेले प्रशांत यादव यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी (दि.१९) वाशिष्ठी व शिव नदीला पूर आला आणि शहरात जलमय परिस्थिती निर्माण झाली.
सुदैवाने मोठे नुकसान टळले, मात्र व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेले तथा वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांनी चिपळूण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी संवाद साधला. चिपळूणच्या पूर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री नीतेश राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बैठक घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
बैठकीत व्यापाऱ्यांनी नदीतील गाळ काढण्याबरोबरच प्रवाहात अडथळा ठरणारी बेटे दूर करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच लाल-निळी पूररेषा रद्द करण्याबाबत अद्याप निर्णय न झाल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.
या चर्चेत व्यापारी संघटनेचे शिरीष काटकर, अरुण भोजने, अश्रफ मेमन, फैसल पिलपिले, कुंदन खातू, महेश महाडिक आदी उपस्थित होते. एकूणच सकारात्मक चर्चा झाल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:11 22-08-2025














