रत्नागिरी : गरोदर महिलांच्या सुरक्षित आरोग्यासाठी राबवली जाणारी प्रधानमंत्री मातृवंदना योजना आता आरोग्य विभागाऐवजी महिला व बालविकास विभागाकडे देण्यात आली आहे. यामुळे अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्यासाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या योजनेंतर्गत पहिल्या अपत्यासाठी ५ हजार रुपये व मुलगी असल्यास ६ हजार रुपयांचा थेट लाभ देण्यात येतो.
या योजनेचा मुख्य उद्देश गरोदर महिलांना गरोदरपणात कामावर जावे लागू नये आणि त्यांना बुडीत मजुरीपोटी आर्थिक मदत मिळावी, हा आहे. या योजनेंतर्गत गरोदर महिलांना ५ हजार रुपयांचा लाभ मिळतो. पहिल्या अपत्यासाठी हा लाभ दोन टप्प्यांत दिला जातो. ३ हजार रुपयांचा पहिला हप्ता गर्भधारणेची नोंद झाल्यावर आणि किमान एक प्रसूतीपूर्व तपासणीनंतर दिला जातो. दुसरा हप्ता मुलींच्या जन्माची नोंदणी आणि पहिले लसीकरण पूर्ण झाल्यावर मिळते. जर दुसरे अपत्य मुलगी असेल, तर थेट ६ हजार रुपयांचा लाभ एका टप्प्यात दिला जातो.
काय आहे मातृवंदना योजना?
केंद्र सरकारने १ जानेवारी २०१७रोजी ही योजना सुरु केली. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
कुणाला मिळणार फायदा?
या योजनेंतर्गत गरीब व पात्र गरोदर महिलांना बुडीत मजुरीपोटी आर्थिक साह्य दिले जाते. पहिल्या अपत्यासाठी ५ हजार रुपये दोन टप्प्यांत दिले जातात. दुसऱ्या अपत्यात ती मुलगी असेल, तर एकाच टप्प्यात ६ हजार रुपये देण्यात येतात. जिल्ह्यातील हजारो मातांना याचा लाभ देण्यात आलेला आहे.
आता अंगणवाडी केंद्रात करा नोंदणी
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत लाभघेण्यासाठी संबंधित महिलांना आता संबंधित गावातील अंगणवाडी केंद्रात जाऊन अंगणवाडीसेविकांकडे योजनेच्या लाभासाठी नोंदणी करता येणार आहे.
अशा टप्प्यांत आर्थिक मदत
या योजनेमध्ये पहिल्या अपत्यासाठी ५ हजार रुपये दिले जातात. त्यामध्ये पहिला हप्ता गर्भधारणेची नोंदणी झाल्यावर ३ हजार, दुसरा हप्ता जन्माची नोंद झाल्यावर व लसीकरण झाल्यावर.
पात्रता आणि अपात्रता
या योजनेसाठी लागणारी पात्रता अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये नियमित काम करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र नाहीत.
कागदपत्रे कोणती, कुठे नोंदणी करायची ?
गर्भवती महिलेचे आधारकार्ड, बाळाच्या जन्माचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पॅन कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 22/Aug/2025














