दापोली : भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने दाभोळमध्ये दोघांवर हल्ला

दापोली : दाभोळ शहर व परिसरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढत असून काल सायंकाळी त्यांनी दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून, परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संध्याकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेले बावा देसाई (वय ६७) व योगेश यशवंत महामुणकर (४२, दोघेही रा. दाभोळ) यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये महामुणकर यांना उपचारानंतर सायंकाळी घरी सोडण्यात आले; मात्र देसाई यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत.

गेल्या दोन महिन्यांत दाभोळमधील लहान मुलांवर कुत्र्यांच्या हल्ल्याच्या ४ ते ५ घटना घडल्या असून, त्यातून गंभीर जखमी होण्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 23/Aug/2025