पुण्यानंतर आता मुंबईतही ‘जॉली एलएलबी 3’ या चित्रपटाविरोधात तक्रारी करण्यात आली आहे. चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये वकील आणि न्यायव्यवस्थेबाबत केलेल्या संवादांवर आक्षेप घेण्यात आला आहे.
तक्रारदारांनी या संवादांना आक्षेपार्ह आणि वकिलांच्या प्रतिमेला धक्का देणारे म्हटले आहे.
तक्रारदारांनी सेन्सॉर बोर्डाकडे चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली आहे. त्यानुसार 19 सप्टेंबर रोजी नियोजित असलेला या चित्रपटाचा रिलीज धोक्यात येऊ शकतो.
‘जॉली एलएलबी 3’ मध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असून, दोघांमध्ये न्यायालयीन लढतीचे नाट्यमय चित्रण करण्यात आले आहे.
याआधी पुणे न्यायालयातही या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या प्रकरणात कोर्टाने अभिनेता अक्षय कुमार, अर्शद वारसी तसेच चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शकांना समन्स बजावले आहे.
याचिकेत ट्रेलरमधील काही दृश्ये व संवादांमुळे संपूर्ण वकिली व्यवसायाची बदनामी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या वादामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांसमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे. सेन्सॉर बोर्ड व न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत चित्रपट नियोजित तारखेला प्रदर्शित होतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, चित्रपटसृष्टीत मात्र या वादावर मिसळलेल्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
काही जण हे फक्त चित्रपटातील काल्पनिक सादरीकरण असल्याचे सांगत असताना, तर काहींनी वकिलांच्या प्रतिमेला धक्का देणारे संवाद कापलेच पाहिजेत अशी भूमिका घेतली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 23-08-2025














