Ratnagiri ST Bus : एसटी गाड्या चाकरमान्यांच्या सेवेत! ग्रामीण भागातील प्रवासी वाहतूक कोलमडली; प्रवाशांचा संताप

खेड : गणेशोत्सव केवळ दोन दिवसांवर आला असताना कोकणातील ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. मुंबई–पुण्यात रोजगारासाठी गेलेल्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकणातील एसटी आगारांतून मोठ्या प्रमाणावर गाड्या हलवल्या जात असल्याने ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासीयांनी एसटीला पहिली पसंती दिली आहे. त्यामुळे एसटीला कोकणवासीयांचा उदंड प्रतिसाद मिळाला असला तरी ग्रामीण भागातील अनेक बस फेऱ्या रद्द केल्यामुळे स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात गावी जाण्यासाठी कोकणवासीयांचा एसटीला उदंड प्रतिसाद मिळाला असून एसटीच्या 4479 बसेस आणि गट आरक्षणासह एकूण 5103 जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झाल्या आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, मुंबईतील कोणवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 23 ऑगस्ट ते 07 सप्टेंबर दरम्यान 5200 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. 23 ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती सुद्धा प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मात्र यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे.

गणेशोत्सवानिमित्त शासनाने 5200 बसेस मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सोडल्या आहेत. पण यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून शेकडो एसटी बसेस मुंबईकडे धाडल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरीच्या खेड तालुक्यासह इतर ठिकाणच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. कारण नोकरी, शिक्षण आणि दैनंदिन कामासाठी एसटी हा ग्रामीण भागाचा मुख्य आधार आहे. मात्र एसटी बसेस मुंबईला धाडल्या असल्यामुळे प्रवाशांना सध्या खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी दुप्पट ते तिप्पट पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासाठी आवश्यक फेऱ्या कायम ठेवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 25-08-2025