रत्नागिरी : केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजना जिल्ह्यात महावितरणच्या माध्यमातून यशस्वीपणे राबवली जात आहे. या योजनेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार १२३ घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवून पूर्ण झाले आहेत. वीज बिलाचा खर्च वाचवण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी नागरिकांनी या योजनेत मोठ्या संख्येने लाभ घेतला आहे.
जिल्ह्याची सद्यःस्थितीत या योजनाच्या लाभासाठी एकूण २ हजार २७४ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ६८४ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर झालेल्या अर्जानुसार, यंत्रणा बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. मंजूर झालेल्या घरांपैकी १ हजार १२३ घरांवर सौरऊर्जा प्रकल्प यशस्वीरीत्या बसवण्यात आले.
ज्यामुळे अनेक कुटुंबांना वीज बिलात मोठी बचत होत आहे. या योजना लाभघेण्यासाठी दाखल केलेल्या प्रस्ताव प्रक्रियेत ५८९ अर्ज विविध कारणांमुळे नामंजूर झाले. ११८ अर्ज अजूनही प्रलंबित आहेत. तांत्रिक अडचणी किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसणे ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात आले आहे.
या योजनेतून वीज घेण्यासाठी यंत्रणा बसवल्यानंतर मीटर जोडणीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. आतापर्यंत ८२९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. ७२४ ठिकाणी एएमआयएसपी डेटामध्ये लोड करण्यात आला आहे. त्यापैकी ८१ ठिकाणी मीटर बसवले गेले आहेत, तर २४ ठिकाणी मोटर बसवणे बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये ही योजना लोकांच्या पसंतीस उतरत आहे. या योजनेमुळे नागरिकांना केवळ आर्थिक फायदाच नाही, तर पर्यावरणाचे संरक्षण करण्यातही मदत मिळत आहे. सरकारचा ‘हर घर सौरऊर्जा’ हा संकल्प या जिल्ह्यात प्रत्यक्षात येत असल्याचे दिसत आहे. – सुनीलकुमार माने, अधीक्षक अभियंता, कोकण परिमंडळ रत्नागिरी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:36 PM 06/Sep/2025














