राजापूर रोड रेल्वेस्थानकाला नवा साज

राजापूर : कोकण रेल्वेमार्गावरील राजापूर रोड रेल्वेस्थानक परिसराचे सुशोभीकरण नुकतेच करण्यात आले आहे. त्यात आकर्षक रंगरंगोटीसह स्वतंत्र पार्किंग व्यवस्थाही केली गेली आहे. त्याचबरोबर रस्त्यावर वाहनथांबाही उभारलेला आहे. नवा साज चढल्यामुळे रेल्वेस्थानकाचे सौंदर्यही अधिक खुलून दिसत आहे.

कोकण रेल्वेमुळे कोकण परिसर मुंबई आणि गोव्याला जोडला गेला आहे. कोकण परिसर देशातील विविध भागांच्या अधिक जवळ आला आहे. राजापूर तालुक्यातील सोल्ये येथील राजापूर रोड रेल्वेस्थानक प्रवाशांसाठी महत्वाचे आहे. हे स्थानक सुरू झाल्यापासून कोणत्याही सुविधा उभारलेल्या नव्हत्या. त्याचवेळी फारसे सुशोभीकरणही करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. शासनाने या रेल्वेथांब्याचे सुशोभीकरण केल्यामुळे सोयीसुविधांही निर्माण करता आल्या. सुमारे पावणेपाच कोटी रुपयांच्या निधीतून येथील रेल्वेस्टेशन परिसर सुशोभित केला गेला आहे. या ठिकाणी रेल्वेस्टेशन परिसरातील प्रवासी थांब्याची आकर्षक पद्धतीने रंगरंगोटी केली आहे. दुचाकी, चारचाकीसह रिक्षा व्यावसायिकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केल्यामुळे गोंधळ उडणार नाही. रेल्वेस्टेशनवर थांबणाऱ्या गाड्यांची माहिती देणारा डिजिटल फलक आणि रस्ता यांसह अन्य सोयीसुविधांही उभारल्या आहेत. त्यामुळे रेल्वेस्टेशनला नवा साज चढला असून रेल्वस्थानकाचे सौंदर्यही खुलले आहे. रेल्वेस्थानकाचे हे देखणं रूप पाहून प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.

शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था

वाहनांच्या पार्किंगसाठी वेगवेगळ्या जागा निश्चित केलेल्या आहेत. त्यामध्ये कार आणि दुचाकीसाठी वेगवेगळी ठिकाणे आहेत. तिथे फलक लावण्यात आल्यामुळे वाहने पार्क करणाऱ्या प्रवाशांना त्याचा फायदा होईल तसेच परिसरात कुठेही चुकीच्या पद्धतीने वाहने उभी राहिलेली दिसणार नाहीत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 19/Oct/2024