गुहागर : तळवलीतील रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित

गुहागर : तळवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुरवस्थेवरून जाहीर केलेले रास्ता रोको आंदोलन अखेर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. या बाबत ग्रामसभेच्या ठरावानुसार आंदोलनाची तयारी सुरू असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाची दखल घेतल्याने हे आंदोलन थांबविण्याचे ग्रामस्थांनी ठरवले.

गेले कित्येक दिवस शेवरी फाटा ते हॉस्पिटल स्टॉप या मुख्य रस्त्याकडे कोणीच लक्ष देत नाही त्यामुळे अखेर ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत रास्ता रोको करण्याचे जाहीर केले होते. मात्र, आंदोलनाच्या आदल्या दिवशी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूणचे श्री. सुखदेवे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्यात आला. यावेळी प्रा. अमोल जड्याळ यांनी पुढाकार घेत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सदर चर्वेला अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हा रास्ता रोको थांबविण्याचे सर्वानुमते ठरले. दरम्यान गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभाग गुहागरचे उपअभियंता एस. एम. पाटील आणि सहाय्यक अभियंता आर. बी. ओतारी यांनी सदर रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली.

दरम्यान, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती सदस्य सुरेश सावंत यांनी या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून त्यांच्या समवेत उपस्थित राहून या चर्चेला पाठिंबा दिला. अधिकाऱ्यांनी रस्त्याचा परिपूर्ण प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवून पक्का डांबरी रस्तालिवकर व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या घडामोडींमुळे ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका योग्य ठरल्याचे सांगितले असून प्रशासनाकडून सकारात्मक चर्चा झाल्याने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामपंचायतने सदर रास्तारोको बाबत संबंधित विभागांना पत्रव्यवहार केला होता. गणेशोत्सव असल्याने मनाई आदेश असल्याचे गुहागर पोलीस स्थानकातून कळविले होते. तर सार्वजनिक बांधकाम विभाग गुहागर व चिपळूण यांनी सामाजिक कार्यकर्ते व प्रा. अमोल जडयाळ यांच्याकडे दूरध्वनीद्वारे यशस्वी चर्चा केल्याने सर्वांनी हे रास्तारोको आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे-मयुरी शिगवण, सरपंच तळवली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 25/Aug/2025