रत्नागिरी: शहरालगत शांतीनगर परिसरात आज सकाळी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली. अनिकेत शशिकांत तेली (वय २५) या तरुणाने धारधार चाकूने आपली आई पूजा शशिकांत तेली यांचा गळा चिरून खून केला. त्यानंतर त्याने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सकाळी ७ च्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहराजवळ असणाऱ्या नाचणे गावातील सुपल वाडी येथे पूजा तेली आणि त्यांचा मुलगा अनिकेत राहत होते. आज सकाळी अनिकेतने अज्ञात कारणातून आईच्या गळ्यावर वार केले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाहून अनिकेतने स्वतःच्या हाताची नस कापून घेतली.
गळा कापल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत असलेला अनिकेत घराबाहेर येऊन बसला, तेव्हा शेजाऱ्यांनी ही घटना पाहिली आणि पोलिसांना माहिती दिली. अनिकेतच्या शेजारीच त्याचे काका राहतात. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विवेक पाटील आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि पंचनामा सुरू केला. पूजा तेली यांचे शव घरातच असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अनिकेतचे वडील शशिकांत तेली यांनी सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर अनिकेत आणि त्याची आई पूजा एकटेच राहत होते. परिसरातील लोकांमध्ये चर्चा आहे की, शेअर बाजारातील उलाढालीतून झालेल्या कर्जामुळे ही घटना घडली असावी, मात्र याबद्दल पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. घटनेमागील नेमके कारण पोलीस तपासाअंतीच स्पष्ट होईल.
दरम्यान, स्वतःच्या हाताची नस कापल्याने गंभीर जखमी झालेल्या अनिकेतला पोलिसांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.












