शालेय विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास काळाची गरज : जिल्हा न्यायाधीश अनिता नेवसे

चिपळूण : शालेय विद्यार्थिनींचा सर्वांगिण विकास हीच काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले.

तालुका विधी सेवा समिती चिपळूण, जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र व माध्यमिक महिला विद्यालय पाग यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. नेवसे बोलत होत्या.

यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे महत्त्व उपस्थित विद्यार्थीनींना सोप्या भाषेत समजावून सांगितले. ११ ऑक्टोबर २०१२ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांनी मुलींच्या वाढत्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याचे ठरविले. हा दिवस जगभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा होतो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बालिका दिनासाठी एक विशिष्ट थीम निश्चित केली जाते. ज्याद्वारे मुलींच्या समस्यांचे निराकरण केले जाते व त्यांच्या हक्कांवर लक्ष केंद्रीत करण्यास मदत होते. सन २०२४ मधील या वर्षाची थिम म्हणजे मुलींचे शिक्षण, सशक्तीकरण आणि आरोग्य असून, मुलींचा सर्वांगिण विकास हाच उद्देश यावर्षी बालिका दिनाच्या निमित्ताने पूर्ण करण्याचा सर्वांचा मानस आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ. अनिता नेवसे यांनी मुलींचे घटनात्मक अधिकार, विविध कायद्यांतील संरक्षणाच्या तरतुदी विविध योजना याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

संरक्षण अधिकारी माधवी जाधव यांनी मुलींना शालेय शिक्षण घेत असताना येणाऱ्या समस्यांना कसे तोंड द्यावे व लैंगिक अत्याचार झाल्यास मुलींनी त्यांची बाजू ठामपणे कशी मांडावी याबाबत मार्गदर्शन केले. जिजाऊ ब्रिगेड आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सदस्या अनुजाराजे भोसले यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका लता शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक अनिल कडव, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष स्नेहल चव्हाण, सीमा चाळके, दीप्ती सावंतदेसाई आदींची उपस्थिती होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 19/Oct/2024