सावर्डे : तब्बल ६५ वर्षीय रुग्णाच्या डाव्या मानेवर गाठ आणि गेल्या महिन्यापासून तोंडात पस येण्याचा त्रास सुरू होता. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार करूनही तात्पुरता आराम मिळत होता; मात्र त्रास कायम राहिला. शेवटी रुग्णाने वालावलकर रुग्णालयात डॉ. प्रतीक शहाणे यांच्याकडे उपचार घेतले. रुग्णालयात अतिशय कुशलतेने अतिक्लिष्ट शस्त्रक्रिया पार पाडली असून, सुमारे १५ मिमी आकाराचा खडा बाहेर काढण्यात आला.
प्राथमिक तपासणीनंतर सोनोग्राफी व एमआर सियालोग्राफी करून लाळग्रंथीत खडा (स्टोन) असल्याचे निदान झाले. त्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. रुग्णाने डॉक्टरांवर विश्वास ठेवून त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. राजीव केणी व डॉ. प्रतीक शहाणे यांनी अतिशय कुशलतेने ही अतिक्लिष्ट शस्त्रक्रिया पार पाडली. यात सुमारे १५ मिमी आकाराचा स्टोन व त्यासोबत आजूबाजूचा लाळग्रंथीचा भाग यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आला. या शस्त्रक्रियेमध्ये चेहरा वाकडा होणे, तोंडाची चव जाणे अशी गुंतागुंत होण्याची शक्यता असते; मात्र संपूर्ण शस्त्रक्रिया कोणतीही गुंतागुंत न होता यशस्वी झाली. या शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञ डॉ. गौरव, डॉ. हिमानी आणि डॉ. प्रदीप पाटील यांनी मोलाची साथ दिली. सद्यःस्थितीत रुग्णाची प्रकृती उत्तम आहे.
शस्त्रक्रिया मोफत
लाळग्रंथीच्या संसर्गामुळे सूज येते आणि लाळेद्वारे पस बाहेर पडतो. हा पस जमा होऊन लाळग्रंथीत स्टोन तयार होतो. त्यामुळे ताप येणे, मानेवर गाठ येणे, तोंडात पस जाणवणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वालावलकर रुग्णालयात ही शस्त्रक्रिया ‘महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना’ अंतर्गत मोफत केली जाते, अशी माहिती रेडिओलॉजिस्ट डॉ. नेताजी पाटील यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 26/Aug/2025














