Ratnagiri News : रत्नागिरीत दिवसाढवळ्या दादागिरी! ST वाहतूक अधीक्षकांना कार्यालयात घुसून मारहाण, सोन्याची चैन तोडली

रत्नागिरी : MSRTC Officer Attacked
रत्नागिरीच्या मध्यवर्ती बस स्थानकात एका सहाय्यक वाहतूक अधीक्षकांना त्यांच्या कार्यालयात घुसून एका व्यक्तीने शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी, २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात अधिकाऱ्याचे कपडे फाडण्यात आले, त्यांची सोन्याची चैन तोडून नुकसान करण्यात आले आणि त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

याप्रकरणी सहाय्यक वाहतूक अधीक्षक प्रद्युम्न दत्तात्रय शिरधनकर (वय ५६, रा. पांडवनगर, नाचणे) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, निखील चंद्रशेखर नार्वेकर (वय ३६, रा. गोळपसडा) याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरधनकर हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या रत्नागिरी आगारात (MSRTC) सहाय्यक वाहतूक अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. Ratnagiri Bus Stand सोमवारी दुपारी ते मध्यवर्ती बस स्थानकातील आपल्या कार्यालयात रजिस्टर लिहिण्याचे शासकीय काम करत होते. त्यावेळी आरोपी निखील नार्वेकर तेथे आला आणि त्याने कोणताही संवाद न साधता, थेट शिरधनकर यांच्या मानेवरील शर्टची कॉलर पकडली.

“तुला माज आला आहे, तुला सोडणार नाही, बघून घेईन, ठार मारीन,” अशी धमकी देत आरोपीने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने शिरधनकर यांची मान टेबलवर दाबून त्यांच्या मानेवर आणि पाठीवर ठोशांनी मारहाण केली. या झटापटीत शिरधनकर यांच्या अंगातील शर्ट आणि बनियन फाटले. आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढून तोडली, जी या घटनेत गहाळ झाली आहे.

या अनपेक्षित हल्ल्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला. घटनेनंतर रात्री उशिरा प्रद्युम्न शिरधनकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी निखील नार्वेकर याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियमाच्या विविध कलमांनुसार (कलम १३२, १२१(१), ३५१(२), ३५२, ३२४(२)) गुन्हा नोंदवला आहे. हल्ला करण्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 26-08-2025