सोशल मीडियावर मानहानीकारक आणि धार्मिक तेढ वाढवणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांवर होणार कारवाई

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यावर चुकीच्या पद्धतीने प्रचार करण्याची पद्धत आता सोशल मीडियावर कार्यरत झालेली दिसत आहे. एखाद्या उमेदवाराची बदनामी करीत धार्मिक तेढ वाढवणाऱ्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर पसरवल्या जाताना दिसत आहेत. याच अनुषंगाने निवडणूक यंत्रणा दक्ष झाली असून पोलीस विभागाला या सर्वांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना करण्यात आली आहे.

त्यानुसार पोलीस आता कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. आज रत्नागिरी पोलिसांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आवाहनात असे म्हणण्यात आले आहे की…
सर्वांना आवाहन आहे की, विधानसभा 2024 निवडणुका अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे, त्यामुळे सर्वांनी तिचे काटेकोरपणे पालन करावे त्याचप्रमाणे सोशल मीडियावरती कोणत्याही प्रकारची एखाद्या व्यक्तीची मानहानी अपमान त्याचप्रमाणे जातीय धार्मिक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट कोणीही टाकू नये. पोलीस विभागाच्या सायबर शाखेतर्फे प्रसारित होणाऱ्या सर्व व्हाट्सअप व इतर माध्यमातून प्रसारित होणाऱ्या पोस्ट यावर लक्ष ठेवण्यात आलेले असून जो कोणी वादग्रस्त व वरील प्रमाणे पोस्ट टाकून त्यामुळे वातावरण खराब होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल अशा व्यक्तीविरुद्ध पोलीस विभागातर्फे अत्यंत कडक कारवाई करण्यात येत आहे. कारवाई झाल्यामुळे व प्रचलित कायद्यामुळे गुन्हा दाखल झाल्यामुळे भविष्यात सदर व्यक्तीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकेल त्यामुळे सर्वांना आवाहन आहे की सोशल मीडियावरती कोणतीही पोस्ट टाकताना अत्यंत खबरदारी घ्यावी व भाषाशैली कोणाच्याही भावना दुखावणार नाही अशा प्रकारची असावी त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातर्फे जमाबंदीचे आदेश लागू असल्याने बेकायदेशीर पणे गर्दी जमवू नये. कोणतेही राजकीय व इतर गर्दी जमवणारे कार्यक्रम असतील तर पोलीस विभाग व निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत रत्नागिरी यांच्या परवानगीशिवाय घेण्यात येऊ नयेत. तरी सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती.

  • – निलेश सुरेश माईनकर
    उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी विभाग, जिल्हा रत्नागिरी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:37 19-10-2024