Guhagar: शृंगारतळीतील पिकअप शेडचे काम पोलिस बंदोबस्तात

गुहागर : गेले काही दिवस श्रृंगारतळी बाजारपेठेमध्ये पिकअप शेड हा विषय चर्चेला येत होता. अखेर पोलिस बंदोबस्तात राष्ट्रीय महामार्ग विभागाने हे काम सुरू केले आहे. यामध्ये बाजारपेठेत खरेदी केल्यानंतर गावी जाणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

बाजारपेठेत पिकअप शेड उभारण्यासाठी स्थानिक प्रशासन प्रयत्न करत होते. १५ ऑगस्टला ग्रामपंचायत, तंटामुक्ती समिती व ग्रामस्थ उपोषणही करणार होते. मात्र तहसीलदारांच्या मध्यस्थीमुळे उपोषण मागे घेण्यात आले. अखेर या कामाला सुरुवात झाली. कामाच्या ठिकाणी असलेल्या व्यापाऱ्यांनीही चांगले सहकार्य केले. पोलिस बंदोबस्तामध्ये हे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुरू केले आहे. रस्त्यावर असलेले खड्डे भरण्याचे काम व गणपतीनिमित्त काही दिवस पथदिवेही सुरू करण्याचे काम अधिकारी ठेकेदाराकडून पूर्ण करून देणार आहेत. भविष्यात हे पथदिवे ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करण्यात येणार आहेत.

या वेळी सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असीम साल्हे, पोलिस निरीक्षक सचिन सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश चव्हाण, पोलिस पाटील विशाल बेलवलकर, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तेलगडे, रूपेश राऊत आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 26-08-2025