Ratnagiri: मिरकरवाडा बंदरातील नौकांचे अवशेष स्वखर्चाने काढून टाकण्याचे आवाहन

रत्नागिरी : मिरकरवाडा बंदराच्या विस्ताराचे काम सुरू असून बंदरातील नौकांचे अवशेष नौकामालकांनी स्वखर्चाने काढून टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिरकरवाडा बंदरात जेटी क्रमांक २ (स्थानिक भाषेतील समीना जेट्टी) आणि जेट्टी क्रमांक ३ (स्थानिक भाषेतील डिझेल जेट्टी) या ठिकाणी नौकांचे मोडलेल्या स्थितीत असलेल्या बुडालेल्या व नष्ट झालेल्या नौकांचे इंजिन व इतर पार्टस आहेत.

कोणतेही मूल्य न येणारे असे नौकांचे सांगाडे, अवशेष बंदरात सोडून दिले आहेत. त्यामुळे बंदरातील इतर नौकांना नौकानयनासाठी अडथळा निर्माण झाला आहे.

संबंधित नौकांचे अवशेष, सांगाडे संबंधित नौकाधारकांनी येत्या 2 सप्टेंबरपर्यंत स्वखर्चाने काढून टाकावे, अन्यथा विभागामार्फत नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अक्षया विनोद मयेकर यांनी कळविले आहे.

मुदतीत संबधितांनी नौकांचे सांगाडे, अवशेष हटविले नाहीत, तर ते प्रशासनामार्फत हटवले जातील आणि या कारवाईकरिता होणारा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल. भविष्यात संबधित नौकाधारकांना कोणत्याही नुकसानभरपाईचा दावा करता येणार नाही. होणाऱ्या नुकसानास शासन जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 26-08-2025