रत्नागिरीमध्ये डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार, एक जखमी

रत्नागिरी शहराला पुन्हा एकदा भीषण अपघाताने हादरवून टाकले आहे. आज संध्याकाळी ७ च्या सुमारास चर्मालयजवळ डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालक मयूर घडशी (वय २१, रा. शिरगाव तिवेंडेवाडी) याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर, दुचाकीच्या मागे बसलेला त्याचा मित्र ओंकार सनगरे (वय २२)  जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत मयूर आणि त्याचा मित्र ओंकार हे दोघे दुचाकीवरून डीमार्ट येथे खरेदीसाठी जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एका भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, मयूरचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर लगेचच स्थानिकांनी धाव घेतली आणि जखमी ओंकारला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. शहरात वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.