Ratnagiri : जिल्ह्यात ४२४ शेतकऱ्यांचे भातशेती, फळ-बागायती पिकांचे नुकसान

रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात १ ते २६ ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ४८ गावांतील ४२४ शेतकऱ्यांचे १२४.७३ हेक्टर क्षेत्रावरील शेती, बागायत पीक, फळपिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक ११२.१४ हेक्टवर भातशेतीचे नुकसान झाले, तर फळपिके, बागायतीसह इतर पिकांचे ११.२७ हेक्टरवरील नुकसान झाले आहे, असे एकूण ११ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जून, जुलैनंतर ऑगस्ट महिन्यातही जोरदार बॅटींग केली. धो-धो पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील ६ नद्यांनी धोकादायक, इशारा पातळी गाठली होती. काही तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कोकणात सर्वाधिक भात शेती करण्यात येते. तब्बल ९८ टक्क्याहून अधिक पेरण्या झाल्या होत्या. ११२.१४ हेक्टर क्षेत्रावरील भात पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये मंडणगडात १६.३५ हेक्टर क्षेत्र, दापोली ३.४७, खेड ७९.४९, संगमेश्वर ७.६० या तालुक्यातील भात शेतीचे नुकसान झाले.

तसेच फळपिके, बागायत दापोली, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापुरातील पिकांनाही फटका बसला आहे. नाचणी पिकांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. दरम्यान, कृषी विभागातर्फे जिल्ह्यात झालेल्या प्राथमिक नुकसानीचा अहवाल तयार केला आहे. तब्बल १० लाख रुपांच्या शेतीपिकांना फटका बसला आहे. नुकसान भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव लवकरच पाठवण्यात येणार आहे.

फळपीक, बागायत पिकांना फटका
जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे आंबा, काजू, केळी, कलिंगड, ड्रॅगन पीक, फणस, भूईमूग, नारळ, यासह विविध फळपिकांसह इतर एकूण ११.७७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात दि. १ ते २६ ऑगस्ट दरम्यान झालेल्या पावसामुळे भात, फळबाग व इतर पिकांना फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान भातशेतीला झाला आहे. प्राथमिक अहवाल तयार केला असून, नुकसान भरपाईसाठी लवकरच शासनाला प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे-शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 28-Aug-25