रत्नागिरी : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर करीत रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी दीड दिवसाच्या तब्बल १३ हजार ८४४ घरगुती आणि ७ सार्वजनिक गणरायांना भाविकांनी भक्तिभावात निरोप दिला. रत्नागिरीच्या भाट्ये व मांडवी समुद्र किनाऱ्यासह ग्रामीण भागातील नद्यांवर बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
फुलांची उधळण करीत, ढोल-ताशांच्या गजरात श्रीगणेशांचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. गणेश विसर्जनासाठी रत्नागिरीतील मांडवी समुद्र किनारी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी खासगी वाहनांमधून आपल्या लाडक्या गणरायाचे विसर्जन केले. मांडवी व भाट्ये समुद्रकिनाऱ्यांसह तालुक्यातील ग्रामीण भागांमध्येही पोलिस यंत्रणेने विशेष दक्षता घेत बंदोबस्त ठेवला होता.
खेड, चिपळूण, दापोली, लांजा, मंडणगड, संगमेश्वर, देवरुख, गुहागर, राजापूर या तालुक्यांचा समावेश आहे. बुधवारी घरोघरी गणरायांचे आगमन झाले असले तरीही अनेकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसाच्या गणपतींचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले. आपल्या लाडक्या बाप्पासोबत कमी वेळ मिळाल्यामुळे बच्चेकंपनी मात्र हिरमुसली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 29-Aug-2025












