चिपळूण : दुपारपर्यंत विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळच्या सुमारास हलक्या सरींची हजेरी लावत दीड दिवसांच्या गणरायाला भाविकांबरोबर निरोप दिला. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येपासून गेले चार दिवस पावसाने जोरदार सरींची बरसात सुरू ठेवली होती. मात्र गुरुवारी सकाळनंतर पावसाने उघडीप देत विश्रांती घेतली. मात्र दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जन वेळेतच पावसाच्या हलक्या सरींची हजेरी लागली.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कोकणवासीयांच्या लाडक्या गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. पावसाच्या हजेरीतच भक्तांनी गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. गणेशोत्सवाचा पहिला टप्पा दीड दिवसांच्या गणेश मूर्ती विसर्जनाने पूर्ण होतो. त्यात गुरुवारी दीड दिवस भक्तांच्या घरी मुक्कामास असलेल्या गणरायाने भक्तांचा निरोप घेतला. एकीकडे दुपारपर्यंत विश्रांती घेतलेल्या पावसाने हलक्या सरींची हजेरी लावली, तर दुसरीकडे दीड दिवस मुक्कामास असलेल्या गणरायाला भावपूर्णवातावरणात भक्तांनी ‘पुढच्या वर्षी लवकर या…’ असे म्हणत निरोप दिला.
पावसाच्या हलक्या सरींमुळे अनेक भक्तांनी पुन्हा एकदा वाहनांचा आधार घेतला. यावेळी शहर परिसरातील दोनशेहून अधिक गणेशमूर्तीचे विसर्जन बहादूरशेख, रामेश्वर तलाव, गांधारेश्वर, वाशिष्ठी पूल, गोवळकोट गणेश विसर्जन घाट, पागमळा आदी ठिकाणी झाले. यावेळी नगर परिषदेने विसर्जनस्थळी बंदोबस्तासह चोख व्यवस्था ठेवली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 29-Aug-2025














