रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड गावात सध्या मोकाट गुरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढला आहे. या मोकाट गुरांमुळे संपूर्ण मालगुंड परिसरातील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हैराण झाले आहेत.
सध्या मालगुंड परिसरात मोकाट गुरे ठिकठिकाणी फिरत असल्याचे चित्र दिसून येते. मात्र संबंधित मोकाट गुरांच्या मालकांकडून आपली गुरे शोधण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले जात नसल्याने सध्या आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र याचा मोठा फटका आणि नाहक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. मालगुंड परिसरातील भंडारवाडा, रहाटागर व नजीकच्या अन्य परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने आणि कष्टाने भात शेती पिकवली आहे. मात्र ही भातशेती पिकण्याच्या अंतिम टप्प्यात आलेली असताना मोकाट गुरांकडून मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान होत आहे. याबाबत मालगुंड भंडारवाडा येथील शेतकरी सुनील उर्फ बादशाह पाटील यांनी सांगितले की, ही मोकाट गुरे मोठ्या प्रमाणात दिवसा व रात्री भटकत असतात. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत असून या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्हाला दिवस रात्र खेटावी लागते. याबाबत संबंधित मोकाट गुरांचे मालक आणि स्थानिक ग्रामपंचायत लक्ष कधी देणार? असा प्रश्न त्यांनी केला.
ही मोकाट गुरे मालगुंड बाजारपेठेतील मुख्य मार्गावर ठाण मांडून बसत असल्यामुळे या मोकाट गुरांचा त्रास लहान मोठ्या वाहन चालकांना होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 29-Aug-2025












