चिपळूण : खेड तालुक्यातील असगणी गावाने क्रीडा क्षेत्रात आपले नाव अजरामर करून ठेवले आहे. गावातील सुपुत्र कुमार सुबोध संदीप मायनाक याची महाराष्ट्र संघात निवड होऊन त्याने असगणी गावासह संपूर्ण खेड तालुक्याचा अभिमान उंचावला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे नुकतीच सातवी अजिंक्यपद टेनिस क्रिकेट स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत सुबोध मायनाकने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत आयोजकांनी त्याची थेट महाराष्ट्र संघासाठी निवड केली. येत्या काही दिवसांत उत्तरप्रदेशातील मथुरा येथे होणाऱ्या ऑल इंडिया टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप २०२५-२६ मध्ये सुबोध मायनाक महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. सुबोध मायनाकचा हा प्रवास मात्र सोपा नव्हता. अत्यंत गरीब परिस्थितीत त्याचे बालपण गेले. घरच्या आर्थिक अडचणींमुळे अनेकदा खेळाची साधने मिळवणेही कठीण झाले. मात्र सुबोधने हार मानली नाही. कष्ट, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर त्याने स्वतःला सिद्ध केले. त्याच्या खेळातील निष्ठा, मेहनत आणि आत्मविश्वासामुळे आज त्याला ही मोठी संधी मिळाली आहे.
गावातील मित्रपरिवार, शिक्षक, कुटुंबीय आणि ग्रामस्थ यांच्या पाठिंब्यामुळे सुबोधचा आत्मविश्वास अधिक वाढला. प्रत्येक स्पर्धेत त्याने कौशल्य दाखवले आणि अनेकदा संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे महाराष्ट्र संघात त्याचा समावेश हा खेड तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. या निवडीबाबत संपूर्ण खेड तालुक्यात आनंदाचे वातावरण असून असगणी गावात उत्साहाची लाट पसरली आहे. सामाजिक संघटना, स्थानिक मंडळे, ग्रामस्थ तसेच खेळाडूंनी सुबोधचे अभिनंदन केले आहे. खेड तालुका मनसेच्या वतीने तसेच असगणी गावाच्या वतीने माजी खेड तालुका अध्यक्ष मनसे नेते संदीप हरी फडकले यांनी सुबोध मायनाकचे मनःपूर्वक अभिनंदन केले. “सुबोधने प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीच्या जोरावर मिळवलेले यश हे तालुक्यातील सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. भविष्यात तो आणखी मोठ्या स्तरावर खेळेल याची खात्री आहे,” असे संदीप फडकले यांनी सांगितले. सुबोध मायनाकच्या या यशामुळे असगणी गावाचे तसेच खेड तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले आहे. त्याच्या पुढील वाटचालीस सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 29-Aug-2025












