Gram sabha : सत्कोंडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा युट्यूबवर ऑनलाईन पद्धतीने

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या सत्कोंडी ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच स्व. अनंतराव बैकर बहुद्देशीय संकुलातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी सरपंच सतिश थुळ होते. या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे ही सभा युट्यूबवर ऑनलाईन घेण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने होणारी ही देशातील पहिलीच ग्रामसभा असावी.

सभेच्या सुरुवातीलाच ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत कुळ्ये यांनी स्वच्छता व कुष्टरोग निवारण्यासाठी शपथ दिली व वर्षभरात मयत झालेल्या ज्ञात-अज्ञातांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये शालांत (दहावी) व उच्च माध्यमिक (बारावी) व समकक्ष परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिकेच्या माध्यमातून होणाऱ्या पंचम प्रकल्पाच्या कामकाजाची माहिती देण्यात आली.

या सभेत महावितरणचे वीज अभियंता श्री. नागवेकर, बी एस.एन.एल. चे अभियंता नितीन बैकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास कोळेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्मार्ट वीज मिटर लावण्यास प्रतिबंध
करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागवेकर यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची माहिती दिली.

बीएस.एन.एल. चे अभियंता नितीन बैकर यांनी मिळणाऱ्या सेवांबद्दल ग्रामस्थांना माहिती दिली. मुख्याध्यापक विलास कोळेकर यांचा ए.डी. फाउंडेशनचा अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापक राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायतीतर्फे राबविण्यात येणाऱ्या घरकुल, गोठा बांधणी, गांडूळखत निर्मिती, शोषखड्डा अशा योजनांच्या लाभार्थ्यांना अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले.

यावेळी गणेशोत्सवानिमित्त ग्रामस्वछता करण्याचे नियोजन करण्यात आले, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची आग्रही भूमिका मांडली. कमी उंचीच्या व शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीसाठी ग्रामस्थांना माहिती दिली.

या सभेला सरपंच सतिश थुळ, उपसरपंच चंद्रकांत मालप, ग्रामपंचायत सदस्य अरुण मोर्ये, अजय काताळे, प्रणाली मालप, समीक्षा घाटे, ममता बंडबे, निकिता शिगवण, ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत कुळ्ये, नवनियुक्त महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन बलेकर, पंचप्रमुख भाऊ काताळे, ज्ञानदी वाचनालय अध्यक्ष संजय बैकर, गावकर प्रकाश मालप, आशा सुजाता खापले, नेहा पवार सिआरपी संगीता मोर्ये अंगणवाडी सेविका चित्रा बैकर कमल मालप रूपाली घोसाळे, पोलिस पाटील श्रीकांत खापले, सुहानी बलेकर, मुख्याध्यापक सुभाष पालये, सुशिल वासावे, महेश राहणे उपस्थित होते. ग्रामसभा संपल्याचे ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत कुळ्ये यांनी जाहीर केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 29-Aug-2025