Khed: दुर्दैवी! गणपती विसर्जनावेळी खेडमध्ये बुडून एकाचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

खेड,Khed (रत्नागिरी): खेड तालुक्यातील भोस्ते गावात दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी एक दुर्दैवी घटना घडली. काल (गुरुवार) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गणपती विसर्जन करताना नदीपात्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मंगेश पाटील (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोस्ते येथील पाटीलवाडी येथील रहिवासी असलेल्या मंगेश पाटील यांनी यावर्षी पहिल्यांदाच आपल्या घरी गणपती आणला होता. दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी ते गावातील एका तरुणासोबत नदीपात्रात उतरले. मात्र, नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही बुडू लागले.

यामध्ये सोबत असलेल्या तरुणाने कसाबसा पोहत किनारा गाठला, परंतु मंगेश पाटील यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. घटनेची माहिती मिळताच खेड नगर परिषदेचे अग्निशामक दल, खेड शहरातील विसर्जन कट्टा पथक, खेड रेस्क्यू टीम आणि एनडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सर्व यंत्रणांनी तातडीने मंगेश पाटील यांचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.

मंगेश पाटील यांच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 29-08-2025