रत्नागिरी, २९ ऑगस्ट २०२५, दुपारी ०२:५० : रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान गोवंश वाहतूक आणि कत्तल संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने लांजा उपविभागातील ओणी ते पाचल मार्गावरील अणुस्कुरा घाटातून अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या 19 गोवंश जनावरांची सुटका केली असून, या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.
दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने लांजा उपविभागात गस्त घालत असताना गोवंशांची अवैध वाहतूक होण्याची विश्वसनीय माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 03:30 वाजता रायपाटण येथे वाहन तपासणीसाठी ठाण मांडले. सकाळी 05:55 वाजता त्यांनी महिंद्रा जीनीओ मॉडेल (क्र. MH-04-FP-6424) आणि आयशर प्रो-1059 मॉडेल (क्र. MH-07-X-1511) या दोन चारचाकी वाहनांना थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान, महिंद्रा जीनीओ वाहनात 8 आणि आयशर वाहनात 11 अशी एकूण 19 गोवंश जनावरे दाटीवाटीने दोर्याने बांधलेली आढळली.
तपासात उघड झाले की, या जनावरांना पाणी किंवा खाद्याची कोणतीही व्यवस्था न देता, वेदना आणि यातना होईल अशा पद्धतीने त्यांची वाहतूक केली जात होती. चालकांकडून गोवंश वाहतुकीचा परवाना किंवा पशु वैद्यकीय तपासणीचा पुरावा सादर करण्यात आला नाही. पुढील चौकशीत चालकांनी ही जनावरे रत्नागिरीतील तबरेज चाँदनीयाँ ठाकुर (रा. परटवली, ता. राजापूर) यांच्याकडून आणल्याचे सांगितले.
या प्रकरणी महिंद्रा जीनीओ वाहनाचे चालक विनायक मनोहर भोईटे (वय 38, रा. पांगरी रोड, रेणुकानगर, निपाणी, शिरगुप्पी, ता. चिकोडी, जि. बेळगावी, कर्नाटक) आणि आयशर वाहनाचे चालक समीर बाळासो मुजावर (वय 31, रा. वॉर्ड नं. 24, कारंडेमळा, गल्ली नं. 3, शहापुर, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्यासह तबरेज ठाकुर यांच्यावर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक 161/2025 अंतर्गत प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 (कलम 11 (1), (घ), (ड), 11 (3) (क)), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (कलम 5 (अ), 5 (ब), 9), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 (कलम 119), मोटार वाहन कायदा 1988 (कलम 66/192, 3/181) आणि प्राण्यांची वाहतूक नियम 1978 (कलम 47, 48, 49, 50, 51, 54, 56) तसेच भा. न्या. सं. 2023 (कलम 3(5)) अन्वये कारवाई करण्यात आली.
या कारवाईत दोन वाहने (किंमत ₹ 20,66,000/-) आणि 19 गोवंश जनावरे जप्त करण्यात आली. जनावरांची सुटका करण्यात आली असून, त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची पशु वैद्यकीय तपासणी सुरू आहे. या प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक ओगले, स.पो.फौ. गोरे, पो.हवा झोरे, पालकर, राजवैद्य, कदम, सवाईराम, शेट्ये आणि चा.पो.कॉ/215 कांबळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये पोलीसांचे कौतुक होत आहे. गणेशोत्सवासारख्या पवित्र काळात अशा अवैध कृत्यांवर कारवाई होणे नागरिकांसाठी दिलासादायक ठरले आहे. पोलिसांनी अशा गुन्ह्यांवर कडक नजर ठेवून पुढील कारवाया करण्याचे आश्वासन दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:53 29-08-2025











