रत्नागिरी : गेल्या दीड वर्षापासून जलजीवन योजनेची कामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे ठेकेदार आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले असून, नैराश्याच्या गर्तेत सापडलेले आहेत. ठेकेदारांची देयके लवकरच अदा करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून ठेकेदारांची देयके अदा झालेली नाहीत. या योजनेच्या कामांसाठी ठेकेदारांनी बँकांकडून कर्ज व उसनवारी करून कामे पूर्णत्वास नेली आहेत. मात्र, ठेकेदारांची देयके अदा न झाल्याने ठेकेदार नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत.
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही ठेकेदारांच्या देयकांसंदर्भात प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत लाड यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे यांची भेट घेऊन ठेकेदारांच्या थकीत देयकांसंदर्भात चर्चा करण्यात आली. निधी उपलब्ध करून देणे, तसेच ठेकेदारांना काम करत असताना येणाऱ्या विविध अडचणी व बिलातून कटिंग करून घेतलेली सुरक्षा अनामत रक्कम ठेकेदारांना परत देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे यांनी आपण निवेदनाद्वारे केलेली निधी उपलब्ध करण्याची मागणी शासनापर्यंत पोहोचवली जाईल व सुरक्षा अनामत रक्कम ठेकेदारांना परत देण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद यावेळी त्यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत लाड, प्रसाद आवले, रुत्वीज घाग, सुरेश खापले, एस. आर. शिंदे, दशरथ दाभोळकर, अमित मागले, मान्स नितीन कदम, महेंद्र कदम आणि विजय पवार, सुरज सावंत, सागर मागले तसेच ५० पेक्षा अधिक ठेकेदार उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:38 PM 29-Aug-2025











