Rajapur : कोदवलीतील महिलांनी बनवले काजूपासून मोदक

राजापूर : राजापूर तालुक्यातील कोदवली मांडवेवाडी येथील महिलांनी गावठी काजूगरांच्या साहाय्याने ‘कोकणी काजूमोदक’ तयार केले आहे. त्यासोबत नारळवडीपासून वैशिष्ट्यपूर्ण मोदकही तयार केले आहेत. व्यावसायिक दृष्टीकोनातून चविष्ट, रूचकर व भेसळविरहीत असलेल्या या कोकणी काजूमोदकांना गणेशभक्तांची पसंती मिळाली असून स्थानिक पातळीवरच त्यांची विक्री होत आहे.

या कोकणी काजूमोदक निर्मिती गृहउद्योगाद्वारे या महिलांनी संसाराचा दैनंदिन डोलारा सांभाळताना गणेशोत्सवात अर्थाजनाचा नवा मार्ग शोधला आहे. विघ्नहर्त्या गणरायांना मोदकाचा प्रसाद पसंद असल्याने गणेशोत्सवात मोदकांना मोठी मागणी असते. मोदकांच्या खरेदी-विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते. ही बाब लक्षात घेऊन तालुक्यातील कोदवली मांडवेवाडी येथील सरस्वती मांडवे, प्रभावती मांडवे, विशाखा मांडवे, सुगंधा मांडवे, सेजल मांडवे, रत्नप्रभा मांडवे, रंजना मांडवे, संजीवनी मांडवे आदींनी गणेशोत्सव अनुषंगाने कोकणी काजू मोदक तयार करण्याचा निर्णय घेतला. प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या काजू मोदकानंतर त्यांनी यावर्षी कोकणी काजू मोदक तयार करण्याचा निर्धार केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 30-Aug-2025