Ratnagiri nagar parishad : रत्नागिरी नगर परिषद मालमत्ता करवसुलीची कार्यवाही सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेने गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच मालमत्ता कर वसुली कार्यवाही सुरू केली. दरवर्षी दिवाळीच्या सुमारास करवसुलीची प्रक्रिया सुरू होते. रत्नागिरी नगर परिषदेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के कर वसुली व्हावी या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडून वसुलीची माहिती घेत आहेत.

शहरामध्ये सुमारे १४ कोटी रुपये इतके मालमत्ता कराचे लक्ष्य असते. त्याचवेळी पाणीपट्टीचे सात ते आठ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट असते. घरपट्टी भरणाऱ्या सुमारे ३४ हजार मालमत्ता आहेत. त्यातील ६० ते ७० टक्के मालमत्ताधारकांना मागणी बिले बजावली असून वसुली विभागाचे कर्मचारी घरपट्टी वसुलीसाठीही फिरत आहेत. पाणीपट्टीची मागणी बिलेही नळधारकांना देण्यात आली आहेत.

नगर परिषदेची आर्थिक स्थिती दोलायमान आहे. अशावेळी नगर परिषदेचा महसूल लवकरात लवकर वसूल व्हावा, यासाठी मुख्याधिकारी गारवे यांनी वसुली व पाणी विभागाला सूचना केल्या असून मुख्याधिकारी आठवड्यातून एकदा वसुली आढावा बैठक घेत आहेत.मालमत्ता कर वसुलीसाठी पाणी विभाग व वसुली विभाग दरवर्षी दिवाळीपासून कार्यरत होतो, परंतु यावेळी ही कार्यवाही गणेशोत्सवा पूर्वीपासूनच सुरू झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 30-Aug-2025