मंडगणड,Mandangad : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गुणवत्ता हमी कक्षा अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने ‘संत श्री. चक्रधर स्वामी’यांचा अवतारदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून डॉ. संगीता घाडगे उपस्थित होत्या तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते. यावेळी, प्रा. हनुमंत सुतार, डॉ. अशोक साळुंखे, डॉ. ज्योती पेठकर, डॉ. मुकेश कदम, प्रा. महादेव वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला ‘संत चक्रधर स्वामी’यांच्या प्रतिमेला प्रभारी प्राचार्य डॉ.वाल्मिक परहर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी सांस्कृतिक विभागाचे प्रा. हनुमंत सुतार यांनी उपस्थितांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. संगीता घाडगे यांनी चक्रधर स्वामींचे जीवन व कार्य याची माहिती दिली. स्त्रीयांना धर्मआचारण व ज्ञानप्राप्तीचा अधिकार आहे हे त्यांनी आपल्या शिष्यपरिवारामध्ये स्त्रीयांचा समावेश करुन कृतीव्दारे दाखवून दिले. तसेच त्यांना अनेक विषयांचे सखोल ज्ञान होते, म्हणून त्यांना सर्वज्ञ असेही म्हणतात. चक्रधर स्वामीनी सर्व धर्म निरुपण मराठी भाषेतून करुन मराठी भाषेला धर्मभाषेचे सिंहासन मिळवून दिले. स्वतः एक प्रधानपुत्र असतानादेखील सर्व राजवैभवाचा त्याग करुन जनतेमध्ये जावून समाज जागृती व ज्ञानदान देण्याचे कार्य त्यांनी केले. स्त्री, शुद्र, दीनदलित आणि प्राणीमात्रांवरती दया करावी हे त्यांनी त्यांच्या अनेक लिळांमधून दाखवून दिले. त्यांच्या भ्रमंतीच्या काळामध्ये त्यांना नागदेव, आबाइसा, महादाइसा, उमाइसा व माहिमभट्ट यासारखा शिष्यपरिवार लाभला. पुढे नागदेव हेच पंथाचे आद्य आचार्य बनले. तर महिमभट्ट यांनी चक्रधर स्वामीचे चरित्र लिहिले. त्यालाच लिळाचरित्र असे म्हणतात. जो मराठी भाषेतला पहिला चरित्रग्रंथ आहे.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर म्हणाले की, चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक होते. त्यांनी ची उपासना करुन कृष्णभक्तीवर आधारीत तत्वज्ञान मांडले व सर्व सामान्य जनतेला मराठी भाषेतून धर्मतत्वे शिकवली. त्यांनी जातपात, अस्पृश्यता सारख्या भेदभावांवर टीका करुन मराठी भाषेला धर्मभाषेचा सन्मान मिळवून दिला. अशा या थोर पुरुषांचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी खेड येथे ज्ञानदिप महाविद्यालयामध्ये मुंबई विद्यापीठ उत्तर रत्नागिरी विभागा अंतर्गत संपन्न झालेल्या 58 व्या युवा महोत्सामध्ये महाविद्यालयाची विद्यार्थीनी रिफत मुकादम हिने मेहंदी स्पर्धेमध्ये सहभाग घेवून उत्तेजनार्थ बक्षीस संपादन केले. त्याबद्दल प्रभारी प्राचार्य डॉ.वाल्मिक परहर यांच्या हस्ते तिचा गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हनुमंत सुतार यांनी तर आभार डॉ. अशोक साळुंखे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 30-08-2025











