रत्नागिरी : गणपत्ती बाप्पांच्याआगमनानंतर तीन ते चार दिवसांनी दीड दिवसासाठी पाहुणी येणाऱ्या गौराईचे आगमन रविवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे. बाजारात विविध प्रकारच्या वस्तू विक्रीला आल्या आहेत. गौराईच्या स्वागतासाठी भाविक सज्ज झाले असून, आवश्यक वस्तूंची खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे.
फायबर, पीओपी, शाडू मातीपासून तयार केलेले गौराईचे मुखवटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गालावर खळी असलेले मुखवटे आकर्षक ठरत असून, त्यालाच वाढती मागणी आहे. गौराईच्या मुखवट्यांसह अखंड / पूर्णाकृती मूर्तीसुद्धा विक्रीसाठी आल्या आहेत. मूर्ती / मुखवटे खरेदीबरोबर गौरीसाठी साड्या, दागिन्यांचीही खरेदी सुरू आहे.
पारंपरिक दागिन्यांना मागणी
गौरीच्या सजावटीत भाविक कोणतीही कसूर ठेवत नाहीत. यावर्षी पारंपरिक दागिन्यांबरोबर ऑक्साइडचे दागिने विक्रीला उपलब्ध आहेत. इमिटिशन ज्वेलरीसह मोत्यांच्या दागिन्यांनाही मागणी आहे. माळ, ठुशी, बोरमाळ, लक्ष्मीहार, पोहेहार, बाजूबंद, झुमके, कर्णफुले, मंगळसूत्र, नथ, कमरपट्टा, किरीट विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
काठाच्या साड्यांना मागणी
गौराईसाठी नवीन साडीची घडी मोडली जाते, त्याकरिता आवर्जून खरेदी करण्यात येते. विशेषतः काठपदरांच्या साड्यांना जास्त मागणी आहे. ४५० रुपयांपासून साड्या उपलब्ध आहेत.
गौरीसाठी ओढणीसुद्धा खरेदी केली जात आहे. गौरीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र उत्साह अधिक असल्यामुळे खर्चाकडे न पाहता आनंदाने खरेदी केली जात आहे.
३५० ते ३,५०० रुपयांपर्यंत मुखवट्यांचे दर
पीओपीपासून तयार केलेले गौरीचे मुखवटे ३५० ते ३,५०० रुपयांपर्यंत विकण्यात येत आहेत. शाडू माती मुखवटे ५०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. फायबर मूर्ती २,०००, पीओपी मूर्ती ५,०००, तर शाडू मूर्ती तीन हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत. पारंपरिक जुन्या मुखवट्यांऐवजी नवीन मुखवट्यांची खरेदी केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 30-Aug-2025












