ठाणे : “मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मनोज जरांगे परत का आले याचं उत्तर देखील एकनाथ शिंदेच देतील. मागच्या वेळेस एकनाथ शिंदे नवी मुंबईत गेले आणि प्रश्न सोडवला होता, मग हे परत का आले?” असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
ते आज ठाण्यात पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांनी ठाकरे यांना मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत प्रश्न विचारले. यावर राज ठाकरेंनी खूप सूचक प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे यांचे सूचक विधान हे स्पष्ट करते की, ते स्वत: या आंदोलनावर थेट भाष्य करण्याऐवजी सर्व प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वळविले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलन सुरु आहे. आझाद मैदानात सुरु असलेल्या उपोषणामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. काही आंदोलक आझाद मैदानाजवळील मुंबई महापालिकेच्या समोर ठिय्या आंदोलन करत आहेत, तर ईस्टर्न फ्री वेवर वाहनांची लांबच लांब रांगा दिसत आल्या. मनोज जरांगे यांनी आपल्याला पोलीसांच्या सूचनेनुसार वाहने मोकळ्या मैदानात पार्क करण्याचे आदेश दिले आहेत.
राज ठाकरे यांनी मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण वादावरही थेट भाष्य करण्याचे टाळले आणि सांगितले, “मी याबाबत उत्तर देऊ शकणार नाही. एकनाथ शिंदे जेव्हा तुम्हाला भेटतील तेव्हा त्यांच्याकडून माहिती घ्या. आरक्षणाबाबत माझी भूमिका सर्वांना ठाऊक आहे; ती जुनी झाली आहे. सध्याच्या घटनांवर केवळ शिंदे बोलू शकतात.”
राज ठाकरे यांचे विधान स्पष्ट करते की, मराठा आरक्षणावर होणाऱ्या घडामोडींवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच अधिकृत उत्तर देऊ शकतील.
आज कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतली आणि मनसैनिकांना निवडणुकीच्या तयारीसाठी आदेश दिले आहेत.
बैठकीत राज ठाकरेंनी मनसैनिकांना स्पष्ट केले की, “निवडणूक यादींवर काम करा, बूथ टू बूथ मतदारांशी संपर्क साधा, वारंवार मतदार यादी तपासा. एक महिन्यात मी पुन्हा विचारणार काय काम केले.” त्यांनी पक्षाच्या ताकदीवर भर देत सांगितले, “सर्वात जास्त काम करण्याची ताकद आपल्या पक्षात आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहे.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:21 30-08-2025














