रत्नागिरी : ईद-ए-मिलाद निमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांची जय्यत तयारी सुरू झाली असून मोहल्ले सजावटीने सजली आहे. घरावर मोठे, लहान हिरवे झेंडे, घरावर लाईटच्या माळांसह घरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान, ईद मिलाद निमित्त शहरासह तालुक्यात ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता ईदचा जुलूस निघणार असल्याचे सांगण्यात आले.
इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या जन्मदिवसानिमित्त ईद-ए-मिलाद (मिलाद-उन-नबी) म्हणून भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. हा दिवस इस्लामिक कॅलेंडरनुसार तिसरा महिना रबीउल अव्वलच्या १२ तारखेला म्हणजेच १२ रबीउल अव्वलला साजरा केला जातो. हा सण आनंदाने आणि चिंतनाने साजरा होतो. उत्सवाचा काळ असला तरी तो दानधर्म, दयाळूपणा आणि आध्यात्मिक चिंतनाच्या कृतींना देखील प्रोत्साहन देतो. ज्यामुळे मुस्लिमांना हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या शांती, करुणा आणि एकतेच्या संदेशाची आठवण होते. त्यामुळे मुस्लिम बांधव कुराण पठण, विशेष प्रार्थना आणि पैगंबरांच्या जीवनावर व्याख्याने आयोजित करतात.
शहरात ईद निमित्त चंद्र आकाराचे पताके, लहान, मोठे हिरवे झेंडे, मक्का, मदिनाचे फोटो असलेले झेंडे, विविध प्रकारच्या लाईटींग विविध प्रकारचे साहित्य विक्रीस दाखल झाले असून मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहान खरेदी करीत आहेत. शहरातील मोहल्ला व सैतवडे, लांजा, दापोली, चिपळूण, राजापूर यासह विविध तालुक्यातील घरोघरी, मोहल्ला परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली आहेत. घरावर लायटींगच्या माळा लावण्यात आल्या आहेत रात्री विद्युत रोषणाईचा झगमगाट दिसत आहे.दरम्यान, ईद निमित्त कोकण नगर मदरसा फैजाने अत्तार येथून कोकण नगर परिसरात रविवारी सायंकाळी ७वाजता लहान मुलांची लक्षवेधी रॅली काढण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने लहान मुले सहभागी होती. नबी का दामन नही छोंडेगे, नारे तकबीर अल्लाह हु अकबरच्या घोषणांनी परिसर दणाणून गेले होते.
रत्नागिरीत शुक्रवारी सकाळी ८.३०ला मिरवणूक
ईद-ए-मिलाद निमित्त रत्नागिरी शहरात शुक्रवार ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता मिरवणूक अर्थात जुलूस निघणार आहे. डंकी नाका दर्गाह येथून ८.३० वाजता यासह विविध तालुक्यातून मिरवणूक निघणार आहे. शहरातील मिरवणूक कोकण नगर येथून मारुती मंदिर, उद्यम नगरमार्गे समारोप कोकण नगरला होणार आहे. यावेळी मौलाना अल्ताफ कुरेशी उपस्थित राहणार आहेत. या रॅलीमध्ये मदरसामधील बांधव तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव जुलूसमध्ये सहभागी होणार आहेत.
लांजात शुक्रवारी मिरवणूक
ईद-मिलाद निमित्त लांजा शहरासह तालुक्यात मुस्लिम बांधवांनी घरोघरी पताके, लायटिंगच्या माळा, लहान, मोठे हिरवे झेंडे घरावर लावले आहे. दर्गाह परिसरात ही सजावट करण्यात आली आहे. घरावरील लायटिंगच्या माळामुळे रात्री घराचे सौंदर्य उजळून दिसत आहे. तसेच सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात ब्रिकीस ठेवण्यात आले असून मोठी विक्री होत आहे. लांजा शहरात शुक्रवारी दुपारी ३.३० ते सायंकाळी ७.३० या वेळेत मोठा जुलूस काढण्यात येणार असून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव या जुलूसमध्ये उपस्थित राहणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 01-Sep-2025














