चिपळूण : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार चिपळूण दौऱ्यावर येत असून रविवार आणि सोमवार असे दोन दिवस ते येथे तळ ठोकणार आहेत. या वेळी काही प्रकल्पांना ते भेटी देणार असून काही महत्वाच्या भेटीगाठीदेखील घेणार आहेत. सोमवारी सकाळी ११ वा. बहादूरशेख येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला संगमेश्वर-चिपळूणसह जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच मित्रपक्षांचे नेतेमंडळी देखील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सरचिटणीस तथा पक्ष निरीक्षक बबनराव कणावजे चिपळूणमध्ये दाखल झाले असून, त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्या दौऱ्याची संपूर्ण माहिती दिली. कणावजे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शरद पवार राष्ट्रवादी पक्षाची तयारी सुरू झाली असून, प्रत्येक मतदार संघात चाचपणी सुरू झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली मतदार संघातून इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे प्राप्त झालेले आहेत; मात्र चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातून एकमेव प्रशांत यादव यांचा अर्ज पक्षाकडे आलेला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीस सामोरे जाणार असल्याने आमची हक्काची जागा म्हणून आम्ही सर्वाधिक लक्ष चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाकडे दिलेले आहे. आमच्या पक्षाकडून यादव यांचे नाव निश्चित असले तरी शेवटी महाविकास आघाडीचा निर्णय अंतिम असेल. आघाडीकडून निर्णय झाल्यानंतरच उमेदवारी जाहीर केली जाईल. शरद पवार यांनी काही महत्वाच्या मतदार संघाकडे अधिक लक्ष घातले असून, त्या अनुषंगाने शरद पवार २२ ला चिपळूणमध्ये येणार आहेत. या दिवशी त्यांचा चिपळूणमध्ये मुक्काम राहणार आहे. वाशिष्ठी दूध प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अशा ठिकाणी ते भेटी देणार आहेत. माजी आमदार रमेश कदम यांच्या निवस्थानीदेखील शरद पवार भेट देणार असून, काही प्रमुख पदाधिकारी, जुने मित्र, ज्येष्ठ पदाधिकारी व नेत्यांच्या भेटीगाठीदेखील ते घेणार आहेत तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी देखील ते संवाद साधणार आहेत.
महाविकास आघाडीतील नेत्यांना निमंत्रण
सोमवारी होणाऱ्या सभेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, वरिष्ठ नेते आणि चिपळूण-संगमेश्वर मतदार संघासह जिल्ह्यातील कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिकदेखील उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 21-09-2024