चिपळूण : ‘मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे आणि राजकीय लोकांना सद्बुद्धी दे गणराया,’ असे गाऱ्हाणे मराठी अभिनेते प्रभाकर मोरे यांनी गणराया पुढे घातले आहे. महामार्गावरील खडतर प्रवासाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी गणरायापुढे कैफियत मांडली.
प्रभाकर मोरे यांचे मूळ गाव चिपळूण तालुक्यातील वहाळ असून, मोरेवाडीत त्यांचे घर आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी गावी आले. मात्र मुंबईहून चिपळूणकडे येताना महामार्गावरील खड्डे, रखडलेली कामे आणि प्रवाशांना सहन करावी लागणारी त्रासदायक अवस्था पाहून ते नाराज झाले आहेत. महामार्गाचे काम सुरू होऊन तब्बल १४ हून अधिक वर्षे उलटली आहेत. तरीही अद्याप या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. कोकणवासीयांना प्रत्येक सणासुदीच्या काळात या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. या स्थितीवर टीका करत श्री. मोरे म्हणाले, ‘गणराया, आम्हाला सुख-समाधान दे. पण या महामार्गाच्या कामाला गती मिळावी, हीच खरी आमची इच्छा आहे. राजकारण्यांना सद्बुद्धी दे, जेणेकरून कोकणातील जनतेला या यातना सहन कराव्या लागू नयेत.’ मोरे यांच्या या गाऱ्हाणे पुन्हा एकदा महामार्गाच्या रखडलेले काम ऐरणीवर आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 01-Sep-2025














