कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

पाचल : गेले काही दिवस पडत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने राजापूर तालुक्यात भातशेती धोक्यात आली असून, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. अनेक ठिकाणी भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे शासनाने कोकणात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सुरेश गुडेकर यांसह शेतकऱ्यांनी केली आहे.

यंदा सुरुवातीपासूनच पाऊस चांगला झाल्याने भातशेती चांगली होती. शेतकरीराजा खूश होता. मात्र, परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. पावसाने भातशेती पूर्णपणे आडवी झाली असून शेतकरीवर्गाच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले आहे. भातशेती आडवी झाल्याने भाताला मोड आले असून अनेक ठिकणी भातशेती पूर्णता कुजली आहे. त्यामुळे शेतकरी या अस्मानी संकटाने उद्ध्वस्त झाला आहे. काही ठिकाणी नाचणी पीकदेखील आडवे झाले आहे.

शेतकऱ्यांचे एवढे मोठ्याप्रमाणात नुकसान होऊन देखील प्रशासन तथा कृषी विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. कृषी विभागाचा कोणीही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकलेला देखील नाही. प्रशासनाने नुकसानग्रस्त भातशेतीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 21/Oct/2024