Dapoli harne bandar : गणेशोत्सवात हर्णे बंदरातील मासेमारी ठप्प

दापोली : तालुक्यातील प्रसिध्द हर्णे बंदरातील मासेमारी उद्योग सध्या पूर्णतः ठप्प आहे. मच्छीमारांसह ग्राहकही गणेशोत्सवात मग्न असल्यामुळे गजबजलेल्या बंदरात शुकशुकाट आहे. नियमित होणारी कोटींच्या घरातील उलाढालीलाही ब्रेक लागलेला आहे.


गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू झाला असला तरीही २५ पासून मासेमारी थांबली आहे. हर्णे बंदरातील मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत चतुर्दशी झाल्यानंतर १० सप्टेंबरपासून मच्छीमार पुन्हा नौका समुद्रात उतरवतील. त्यामुळे आंजर्ले खाडीत तब्बल ९९ टक्के नौका नांगरलेल्या आहेत. यंदा हंगामाची सुरुवात समाधानकारक झाली. पहिल्याच दिवशी ५० नौका मासेमारीसाठी रवाना झाल्या. त्यानंतर हळूहळू सर्वच नौकांनी मासेमारीला जाण्यास सुरुवात केली. दोन आठवड्यात पापलेट मासळीचा चांगला बहर होता; परंतु बाजारभाव मात्र समाधानकारक नव्हता. त्यानंतर म्हाकूळही मिळू लागली. पण, दर कमी होते. १३ ऑगस्टपासून १० ते १२ दिवस वादळी वातावरणामुळे समुद्र खवळला होता. या कालावधीत मच्छीमारांना जयगड, आंजर्ले अशा सुरक्षित खाड्यांचा आसरा घ्यावा लागला. परिणामी हंगामातील काही दिवस वाया गेले. २१ तारखेपासून पुन्हा मासेमारी सुरू झाली. त्यानंतर चारच दिवसांनी गणेशोत्सव आला. या कालावधीत मच्छीला मागणी कमी असते. तसेच मच्छीमारांच्या घरीही उत्सव असतो. त्यामुळे मासेमारी बंद आहे. एखादी नौकाच समुद्रात मासेमारीसाठी जाते.

सध्या घाऊक बाजार, किरकोळ बाजार, वाहतूक, बर्फ कारखाने, डिझेल पुरवठा तसेच मजुरांचे रोजंदारीवर अवलंबून असलेले व्यवहार ठप्प झाले आहेत.

यावर्षीचा हंगाम तसा बरा गेला. ना नफा ना तोटा या तत्त्वावर उलाढाल झाली. आता फक्त गणेशोत्सवासाठी हर्णे बंदरातील मासेमारी उद्योग बंद आहे. सर्व नौका आंजर्ले खाडीत शाकारलेल्या आहेत. आता अनंतचतुर्दशी झाली की चार दिवस पुढे पौर्णिमेचे उधाण आहे. दोन दिवसात तयारी करून किमान १० सप्टेंबरला तरी नौका आंजर्ले खाडीतून मासेमारीला बाहेर पडतील. – अंकुश दोरकुळकर, संचालक, हर्णे-पाज मच्छिमार संस्था

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:51 PM 01-Sep-2025