चिपळूण : राज्य फेडरेशन व महासंघातर्फे करण्यात आलेल्या शिखर परिषदेतील ठरावानुसार रेशन दुकानदारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचा १ नोव्हेंबर रोजी धान्य उचल व वितरण बंद आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक- मालक संघटना रत्नागिरी या संघटनेने दिला आहे. या संदर्भात नुकतीच चिपळूण येथे संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
या बैठकीत या आंदोलनाच्या दृष्टीने चर्चा झाली. राज्य फेडरेशन व महासंघ आयोजित शिखर परिषदेत झालेल्या ठरावानुसार रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटना रत्नागिरी या संघटनेच्या बैठकीत चर्चेअंती १ नोव्हेंबरपासून धान्य उचल व वितरण बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे. यानुसार प्रति क्विंटल ३०० रुपये मार्जिन मिळावे, आनंदाचा शिदा जिन्नस संचाच्या वितरणाकरता धान्य दुकानदारांना १५ टक्के मार्जिन मिळावे, धान्य दुकानांचे व्यवस्थापन करण्याकरता महिना किमान ३ हजार ते ७ हजार रुपये इतकी रकम निर्धारित करावी, केरोसीन परवाना नूतनीकरण करून मिळणे, ई-केवायसीचे काम पुरवठा विभागामार्फत व्हावे आदी मागण्या करण्यात येणार आहेत.
या मागण्यांचा विचार न झाल्यास १ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटना बंद आंदोलनात सहभाग घेईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाच्या अनुषंगाने २१ ऑक्टोबर रोजी खेरशेत विसावा सभागृहात जिल्ह्यातील रेशन दुकानदारांची एकत्रित सभा होणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी दिली.
यावेळी सचिव प्रकाश आग्रे, शशिकांत दळवी, विजय राऊत, महेश साबळे, दिलीप राणे, बाळकृष्ण ओक, सचिन वळजू, विश्वास खरे, संतोष उतेकर, समाधान संसारे, समीर मंडलिक आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 21/Oct/2024









