भाजपच्या पहिल्या यादीत गुहागर नाही; जागेबाबत उत्सुकता

गुहागर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. त्यामुळे गुहागरमधील जागेबाबतची उत्सुकता वाढली आहे. भाजपमधील इच्छुकांसह अन्य पदाधिकारी हिरमुसले आहेत. तसेच हो जागा शिवसेना लढवणार की पुन्हा भाजपच्या वाट्याला येणार हे स्पष्ट झालेले नाही.

शिवसेना-भाजप युतीच्या जागा वाटपात गुहागर विधानसभा मतदार संघाची जागा शिवसेनेकडे आहे. शिवसेना शिंदे गटाने ही जागा लढविण्याची घोषणा केली आहे. पक्षाच्या नेत्याकडून उमेदवाराचे नाव ही घोषित केले आहे. त्यानंतर शिवसेनेच्या उमेदवाराने मतदार संघात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर भाजपनेही या मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मागील वर्षापासून भाजपही गुहागरची जागा लढवण्याच्या तयारीत आहे. परंतु प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचा बलाढ्य उमेदवार असल्यामुळे येथे कोणाला उमेदवारी द्यायची यावरून शिवसेना भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. निवडणुकीचा कालावधी सुरू झाल्यानंतर नवनवीन चर्चा समोर येत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडून हट्टाने मागून घेतली होती. त्या बदल्यात रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभेच्या जागा शिवसेनेला देण्याचे भाजपकडून मान्य केले होते. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी चार जागा शिवसेनेच्या वाट्याला भाजपने सोडल्याचे सांगितले जात आहे. मात्र भाजप स्थानिक कार्यकत्यांना गुहागरची जागा आपल्यालाच मिळेल अशी आशा आहे, ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची अद्याप घोषणा झालेली नाही. त्यामुळे गुहागरची उमेदवारी शिवसेनेच्या कोणत्या उमेदवाराला मिळेल हे अद्याप निश्चित नाही. भाजपच्या पहिल्या यादीत गुहागरचा समावेश नाही. त्यामुळे आता भाजपची दुसरी यादी आणि शिंदे शिवसेनेच्या पहिल्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुहागरची जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यांनी वरिष्ठांपर्यंत ती पोहोचवली आहे. जागावाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहेत. लवकरच गुहागरच्या जागेबाबत निर्णय होईल. – डॉ. विनय नातू, माजी आमदार, गुहागर

गुहागर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेची आहे. कार्यकर्त्यांना आधार देणारा आणि विरोधकांना भिडणारे खंबीर नेतृत्व आम्हाला मिळाले तर आम्ही गुहागरची जागा लढवू आणि जिंकून दाखवू शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते त्यासाठी प्रयत्न करतील. – दीपक कनगुटकर, तालुकाध्यक्ष, शिवसेना शिंदे गट

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 21-10-2024