रत्नागिरी : मध्य प्रदेशातील तरुणाला बेशुद्धावस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. हरकेश लल्लू सिंह (वय ३८, सध्या रा. टिळक आळी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ३०) रात्री अकराच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हरकेश सिंह व त्यांच्यासोबत सुखेंद्र कुमार रजत, रामा सिंग, नंदू सिंग हे बांधकाम व्यवसायासाठी एक महिन्यापासून रत्नागिरीमध्ये आहेत. हरकेश सिंह यांच्या डाव्या पायाच्या ढोपरावर फोड आल्याने त्याला मेडीकल दुकानातून गोळी आणून खाण्यास दिली होती.
त्यानंतर त्याला उलट्या झाल्या. त्यानंतर त्याचा पाय अधिक दुखत होता म्हणून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार करुन सोडून देण्यात आले होते. घरी आराम करत होते. माहिती देणारे त्रिलोक विशाल सिंह हे सायंकाळी घरी आल्यावर त्यांनी हरकेशला उठविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो बेशुद्धावस्थेत होता. तत्काळ त्याला पुन्हा उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 02-Sep-2025












