Ratnagiri ganpati visarjan : गौरी-गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मांडवी, भाट्ये किनारी पोलिसांचा कडक बंदोबस्त

रत्नागिरी : जिल्ह्यात मंगळवारी (ता. २) गौरी-गणपती विसर्जन होणार आहे. जिल्ह्यातील १ लाख १ हजार ३२९ घरगुती तर १६ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होईल. रत्नागिरी शहरात मांडवी, भाट्ये किनारी विसर्जनासाठी मोठी गर्दी होणार असून, तिथे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवलेली असल्यामुळे विसर्जन मिरवणुकांवर पावसाचे सावट राहणार आहे.

जिल्ह्यात यंदा २७ ऑगस्टला लाडक्या गणरायाचे उत्साहात आगमन झाले. दीड दिवस, पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर आता सर्वांना सात दिवसांनी होत असलेल्या गौरी गणपती विसर्जनाचे वेध लागलेले आहेत. गेले सात घराघरामध्ये गणरायाची भक्तीभावे पूजा-अर्चा करण्यात आली आहे. ग्रामीण भागांत आरत्या, भजनांसह विविध कार्यक्रमही झाले. सर्वत्र मंगलमय वातावरण होते. सोमवारी गौरी पूजनही उत्साहात झाले. नवविवाहितांनीही गौरीपुढे ओवसे भरले. त्यासाठी माहेरवाशीणी गावी दाखल झालेल्या होत्या. दिवसभर पावसाचे वातावरण असल्यामुळे सर्वांनाच कसरत करावी लागत होती. मंगळवारी विसर्जन असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व विसर्जन घाटावर सुरक्षितता ठेवण्यात आली आहे. रत्नागिरी शहरातील भालो व मांडवी किनारी सर्वाधिक गणपतींचे विसर्जन होणार आहे. रत्नागिरी नगरपालिकेने विसर्जनासाठी माळनाका येथे कृत्रिम तलावही उभारलेला आहे. ग्रामीण भागात पोलिस पाटलांनाही सूचना देऊन प्रशासनाने योग्य ते नियोजन केले आहे.

दरम्यान, रत्नागिरी पालिकेने निर्माल्य संकलनासाठी मांडवी येथे कलश ठेवला आहे. पालिकेकडून गणेशमूर्ती संकलनासाठी एक गाडीही उभी केली आहे. तसेच मांडवी किनारी चार रस्त्यावर पहिला पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:04 PM 02-Sep-2025