खेड : रोटरी इंग्लिश मीडिअम स्कूल खेडतर्फे भरणे बाईतवाडी परिसरामध्ये मतदान जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. सकाळी १०.३० वाजता मतदान जनजागृती रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये रोटरी स्कूलमधील इ. ९ वीतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये ‘उठ मतदार जागा हो’, ‘मतदान करा, आपला हक्क बजावा’ अशा घोषणा देत १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असा संदेश सर्वांना दिला. या मतदान जनजागृती फेरीच्या वेळी शाळेतील शिक्षिका मीनाक्षी निवाते यांनी उपस्थितांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले. प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार बजावून देशाप्रती आपली महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, असे सांगितले. तसेच शाळेतील विद्यार्थी शुभम भंडारे याने आपल्या भाषणातून उपस्थितांना मतदानाचे महत्त्व सांगितले.
यावेळी भरणे बाईतवाडी परिसरातील शशी जगदाळे, माजी नगरसेवक प्रसाद शिगवण यांचे अनमोल सहकार्य लाभले तसेच शाळेतील उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख प्रितम वडके, मीनाक्षी निवाते, प्रशांत भारदे, देवयानी महाजन, छाया भोजने, गीतांजली अप्पाला, वैभव भुवड यांनी या मतदार जनजागृती फेरीच्या यशस्वीततेसाठी विशेष मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 21/Oct/2024









