रत्नागिरी, Ratnagiri : टिळक आळीतील सध्याचे प्रसिद्ध श्री गणपती मंदिर आहे. तिथे वड व पिंपळ अशी दोन झाडे होती. तिथे मंदिराचे बांधकाम करण्यात मांडवी येथील (कै.) नाना सुर्वे यांचेही सहकार्य लाभले. १९१० ला पारावरील गणेशमूर्ती वर्गणी काढून आणली होती. या मूर्तीची स्थापना वैशाख शुद्ध चतुर्थी म्हणजे १२ मे १९१० रोजी झाली. कै. भांबूकाका जोशी गणपती स्थापना दिन साजरा करत, म्हणजे एका अर्थाने पारावरील गणपतीचे स्थान ११५ वर्षे जुने ठरते.
टिळक आळीत एक पार होता. त्या पारावर एक डेरेदार अश्वत्थ म्हणजेच पिंपळवृक्ष होता. या पिंपळाच्या बुंध्याशी रानडे नामक गृहस्थांनी मारुतीरायाची स्थापना केली होती. त्याच ठिकाणी दत्तपदुका व शिवलिंगही स्थापित आहे, असे सांगितले जाते. यामुळे या ठिकाणाचे नामाभिधान गणपती-मारुती पिंपळपार. तेथे मारुती आधीपासून होते. गणपती नंतर वसवले; पण गजाननाचा मान पहिला. पारावर बसवायची मूर्ती (कै.) भांबूदादा (दिनकर कृष्ण) जोशी यांच्या घरी ठेवली होती; पण त्या वेळी (कै.) कृष्णाजीपंत जोशी (भांबूदादांचे वडील) यांच्या पोटात दुखायला लागले. ते काही केल्या थांबेना म्हणून मग शेवटचा पर्याय म्हणून त्या गणेशमूर्तीपुढे प्रार्थना केली व मी तुझी प्राणप्रतिष्ठा करून रोज पूजा करेन, असे त्यानी सांगितल्यानंतर; मात्र त्यांची पोटदुखी थांबल्याची माहिती जयंत जोशी यांनी दिली. तेव्हापासून त्यांनी कबूल केल्याप्रमाणे आजही जोशी कुटुंबीय त्याची पूजा करत आहेत. ही पूजाही ११५ वर्षे जोशी कुटुंबीयांकडून सुरू आहे. ट्रस्टने नेमलेले पुजारी पूजा नियमित करतात. १९२८ मध्ये पारावर दोन्ही घुमटीवर शेवडेमास्तरांच्या पुढाकाराने छत उभारले गेले, ज्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी दूर झाल्या.
१०६ वर्षे दर शनिवारी भजन
लोकमान्य टिळक यांची ब्रिटिशांच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे पुणे -इंदोर-नागपूर-बडोदा-कोलकाता आदी शहरांमधून उत्सव सुरू झाले. लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमीतही म्हणजेच टिळकआळीतही गणेशोत्सव सुरू झाला ते वर्ष १९२५; मात्र त्याही आधी त्या स्थानी गणेशपूजा सुरू होती. पिंपळपार येथे असलेल्या मारुतीच्या स्थानामुळे १०६ वर्षाहून अधिक काळ दर शनिवारी भजन केले जाते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:34 02-09-2025














