खेड : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अभियानांतर्गत ३५% अनुदानाच्या साहाय्याने आणि भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे महाराष्ट्र युवक अध्यक्ष किरण तायडे यांच्या सहकार्याने विना मोबदला श्री.प्रविण शिर्के यांचा फूड व्हॅन प्रकल्प आज सुरू करण्यात आला. या प्रकल्पाचे उद्घाटन उत्तर रत्नागिरी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ. सोनललक्ष्मी घाग यांच्या हस्ते खेड येथे पार पडले.
या विशेष उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील सूर्यप्रकाशावर (सोलर पॅनल) चालणारी ही पहिलीच फूड व्हॅन असून ती खेड तालुक्यातील सुपुत्र प्रणव मापुस्कर यांनी तयार केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी हा प्रकल्प अभिमानाची बाब असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग म्हणाल्या, ‘राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांचे स्वप्न आहे की तरुणांना रोजगार मिळावा. छोटे व्यापारी आणि दुकानदार मोदी सरकारच्या चुकीच्या GST धोरणामुळे अडचणीत सापडले आहेत, त्यांना वाचवण्याची जवाबदारी काँग्रेस पक्ष स्वीकारणार आहे. रत्नागिरी जिल्हा त्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करत आहे.’
युवा काँग्रेसचे नेते किरण तायडे यांनी सांगितले की, ‘महाराष्ट्रातील युवकांना उद्योजक बनवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. कोणत्याही युवकाला व्यावसाय सुरू करायचा असल्यास त्याला कोणताही आर्थिक भार न पडता, विना मोबदला मदत करण्याचा आमचा संकल्प आहे.’
या कार्यक्रमाला स्वराज गांधी, संदीप धारिया, प्रकल्पाचे निर्माते प्रणव मापुस्कर, युवा उद्योजक प्रविण शिर्के तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खेड तालुक्यातील या अभिनव सोलर फूड व्हॅन प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:47 02-09-2025














