राजापूर : राज्यातील अन्य जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघ वाढत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात मात्र विधानसभा मतदारसंघ न वाढता कमी झाल्याचे पहावयास मिळत आहे. सन १९६२ च्या काळात जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ होते. तथापि, गेल्या काही वर्षांत त्यामध्ये घट होऊन सन २०२४ च्या निवडणुकीत जिल्ह्यात एकूण मतदारसंघाची संख्या पाचवर येऊन ठेपली आहे. या पूर्वी सन १९६२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात विधानसभेचेने एकूण मतदारसंघ नऊ होते. त्यामध्ये खेड, दापोली, गुहागर, चिपळूण, माखजन (अ. ज.), संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर यांचा समावेश होता तर त्यानंतर १९६७ ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत माखजन मतदारसंघ कमी करण्यात आला आणि जिल्ह्यात आठ मतदारसंघ राहिले.
१९७२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आठ मतदारसंघ कायम राहिले. मात्र, १९७८ च्या निवडणुकीत लांजा मतदारसंघ कमी करण्यात आला आणि जिल्ह्यात सात मतदारसंघ राहिले. त्यानंतर सन १९८०, १९८५, १९९०, १९९५, १९९९, २००४ पर्यंत जिल्ह्यात सात मतदारसंघ राहिले. मात्र, २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत खेड आणि संगमेश्वर असे दोन मतदारसंघ कमी करण्यात आले आणि जिल्ह्यातील मतदारसंघाची संख्या घसरून पाचवर आली तेव्हापासून २००९,२०१४, २०१९ आणि आता २०२४ पर्यंत जिल्ह्यात पाच मतदारसंघ राहिले असून त्यांचा विस्तार वाढला आहे.
मतदारसंघाच्या फेररचनेत महानगरांसह अनेक जिल्ह्यांत मतदारसंघाची संख्या वाढत असताना रत्नागिरी जिल्ह्यात मात्र, ती कमी होताना दिसत आहे. त्याला अनेक कारणे असल्याचे बोलले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 21/Oct/2024









