Sangameshwar : कडवई पाझर तलावाचे १८ वर्षे काम रखडले

संगमेश्वर : कडवई घोसाळकर कोंड येथील पाझर तलावाचे काम २००७ मध्ये बंद पडले. त्यानंतर तब्बल १८ वर्षे लोटली तरी अद्याप अर्धवट पडलेले ते काम पूर्ण करण्यात आले नसल्याने साऱ्या परिसरातील हजारो ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय होत आहे. हे काम शासनाने प्राधान्याने पूर्ण करावे, अशी मागणी कडवई परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. कडवई घोसाळकर कोंड येथील पाझर तलावाचे काम मागील १८ वर्षांपासून अर्धवट स्थितीत असून अनेक वेळा अर्ज विनंती करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.

कडवई घोसाळकरकोंड येथील पाझर तलावाचे काम ८ डिसेंबर २००७ला सुरू झाले. परंतु काम सुरू होऊन महिनाभरातच ते बंद पडले. त्यानंतर थोडीथोडकी नव्हेत तर तब्बल १८ वर्षे लोटली तरी ते अर्धवट स्थितीत असलेले पाझर तलावाचे काम पूर्ण झालेले नाही. कडवई येथील ग्रामस्थांनी अनेकवेळा ते काम पूर्ण होण्यासाठी शासन दरबारी अर्ज विनंत्या केल्या, मंत्रालयात खेटे मारले, अनेक पुढाऱ्यांचे उंबरठे झिजवले परंतु ते काम अद्यापही पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे साऱ्या परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कडवई घोसाळकरकोंड येथील पाझर तलावाचा लाभ घोसाळकरवाडी, सुतारवाडी, तांबडवाडी, दळवीवाडी, पुरोहितवाडी व बाजारपेठ या परिसरातील ग्रामस्थांना होणार असल्याने ग्रामस्थांच्या मागणीनुसार पाझर तलावाचे काम सुरू झाले होते. पावसाळ्यात पाझर तलाव तुडुंब भरतो परंतु काम अपुरे असल्याने उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते.

कालव्याच्या खोलीमुळे पाणी वाहून जाते
या पाझर तलावात पावसाळ्यात जमा झालेले जादा पाणी विसर्ग होण्यासाठी जो कालवा खोदण्यात आला आहे त्याची खोली अधिक असल्याने पाणी निघून जाते. पावसाळा संपताच पाझर तलावात ठणठणाट होतो. तसेच पाझर तलावाला संरक्षक बंधारा नसल्याने आजूबाजूच्या शेत जमिनीची धूप होते. शिवाय पाणी जिरून तलावातले पाणी पावसाळ्यानंतर लगेच संपून जाते. त्यामुळे तलावाला संरक्षक बंधारा बांधण्यात यावा व जादा पाणी विसर्ग होण्यासाठी खोदण्यात आलेल्या कालव्याची उंची कमी करावी, अशी मागणी कडवईतील नागरिकांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 04/Sep/2025