रत्नागिरी : शिक्षण क्षेत्रात मानाचे समजले जाणारे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक आदर्श पुरस्कार गुरुवारी जाहीर केले. जिल्ह्यातील ९ जणांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस. दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
जिल्ह्यातून २०२५साठी या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. यासाठी एकूण २७ प्रस्ताव आले होते. प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची निवड आदर्श शिक्षकासाठी करण्यात आली आहे. एकूण १०० गुणांचे मूल्यांकन करण्यात आले, यामध्ये शैक्षणिक पात्रता, गोपनीय अहवाल, शिष्यवृत्ती परीक्षेत मार्गदर्शन, शैक्षणिक संशोधन, लेखन व व्याख्यान, शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक उठाव, ग्रामीण भागातील सेवाकार्य, आदी गोष्टींचा विचार करण्यात आला, अशी माहिती जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिली. यावेळी शिक्षणाधिकारी किरण लोहार, जि.प. उपमुख्यकार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, प्रभारी उपशिक्षणाधिकारी संदेश कडव आदी उपस्थित होते.
या शिक्षकांना लवकरच पुरस्कार वितरित करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले.
पुरस्कार प्राप्त शिक्षक
मंडणगड-संजय करावडे (बामणघर), दापोली-जावेद शेख (वाकवली), खेड-एकनाथ पाटील (सवेणी), चिपळूण-नरेश मोरे (पाग), गुहागर-चंद्रकांत बेलेकर (जानवळे), संगमेश्वर-विनय होडे (हातीव), रत्नागिरी-प्रदीप जाधव (भोके, आंबेकरवाडी), लांजा – नितीन शेंडगे (वाकेड), राजापूर-सुहास काडगे (कन्याशाळा, राजापूर)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:20 AM 05/Sep/2025














